महाराष्ट्रात जन्मलेले पेंग्विनही मराठीच, राणीच्या बागेतील पिलांच्या इंग्रजी नावांवरून वाद

Published : Jun 05, 2025, 04:11 PM ISTUpdated : Jun 05, 2025, 04:12 PM IST
penguin mumbai

सार

मुंबईतील राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरुन गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या पेंग्विनला मराठी नावे देण्यात यावीत, असा आग्रह भाजपने धरला आहे.

मुंबई - सध्या शालेय शिक्षणातील हिंदीच्या सक्तिमुळे प्रचंड वाद सुरु आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात केवळ मराठी आणि इंग्रजी सक्तीची असावी, अशी भूमिका घेतली आहे. आता या मराठी अस्मितेच्या वादात भाजपनेही उडी घेतली आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईतील राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरुन गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या पेंग्विनला मराठी नावे देण्यात यावीत, असा आग्रह भाजपने धरला आहे.

मुंबईच्या प्रसिद्ध राणी बागेतील (वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय) नवजात पेंग्विन पिलांना इंग्रजी नावे दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप पदाधिकारी नितीन बनकर यांनी या विरोधाचे नेतृत्व करत मराठी नावांची मागणी जोरकसपणे मांडली आहे.

नवजात पिलांना नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावे देण्यात आली आहेत. ही परंपरा २०१६ मध्ये दक्षिण कोरियातून पहिले हंबोल्ट पेंग्विन मुंबईत आणल्यानंतर सुरू झाली होती. मात्र या वर्षी मुंबईच्या मातीत जन्मलेल्या पिलांना इंग्रजी नावे दिल्याने काही मराठीप्रेमींमध्ये नाराजी आहे.

महाराष्ट्रात जन्म झाला आहे, मराठी नावे द्या

“जेव्हा परदेशातून पेंग्विन आणले, तेव्हा त्यांना इंग्रजी नावे ठेवली, ते मान्य केलं. पण मुंबईत, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या पिलांना मराठी नावे देण्यात यावीत, अशी आमची मागणी आहे. यासाठी मी BMC ला वेळोवेळी निवेदने दिली, पण कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” असं बनकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते पुढे म्हणाले, “हा विषय केवळ नावांचा नाही, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा संघर्षही आहे.”

राणी बागेत रमले पेंग्विन

  • झू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ मध्ये तीन पिलांचा जन्म झाला.
  • ३ मार्च: पोपी आणि ऑलिव्ह या जोडीला ‘नॉडी’
  • ७ मार्च: डायसी आणि डोनाल्ड यांना ‘टॉम’
  • ११ मार्च: त्याच जोडीला ‘पिंगू’

झूतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “टॉम हे नाव ‘जून २०२३’ मध्ये जन्मलेल्या जॅरीशी जुळणारे आहे. टॉम मोठं असल्यामुळे आईवडील त्याला अधिक अन्न देतात. पिंगूला आम्हाला जास्त भरवावं लागतं.”

या पिलांची देखभाल आईवडीलच करतात, तसेच झू कर्मचारी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहेत. झूलॉजिस्ट डॉ. अभिषेक साटम यांनी सांगितले की, “ही पिलं सुमारे तीन महिन्यांची झाल्यावर तलावाच्या भागात स्वतःहून फिरायला लागतील.”

महाराष्ट्राचे जागतिक पातळीवर नाव

या नवजात पिलांमुळे झूमधील एकूण हंबोल्ट पेंग्विन्सची संख्या २१ झाली आहे. प्राणीसंग्रहालय २५ पेंग्विनपर्यंतची क्षमता सध्या सांभाळत असून, आणखी ४०० चौरस फुटांनी विस्ताराची योजना प्रशासन आखत आहे. त्यामुळे ४० पेंग्विन्स ठेवता येतील, असा अंदाज आहे.

सध्या बऱ्याच पेंग्विन्स ६-७ वर्षांच्या असून, त्यांना १५ वर्षांपर्यंत प्रजनन करता येतं. त्यामुळे भविष्यात अजून पिलांची अपेक्षा झू प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नावांवर तापले वातावरण

या संपूर्ण प्रकरणात केवळ नावांपुरता मुद्दा मर्यादित राहिलेला नाही, तर मराठी अस्मिता, स्थानिक संस्कृती आणि शासकीय संस्थांचा प्रतिसाद या मुद्द्यांवर चर्चेचं केंद्रबिंदू बनलं आहे. आगामी काळात BMC या मागणीला प्रतिसाद देईल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट