
मुंबई : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित तसंच संपर्कात असलेल्या संबंधितांवर राज्यभरातून छापेमारी केली जात आहे. याप्रकरणी राज्यभरात दिडशेहून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जात आहे. राज्यभरातून १५० हून अधिक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गँगस्टर भट्टी याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर ATS कडून छापेमारी होत आहे.
मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरात एटीएसकडून छापेमारी केली जात आहे. ही छापेमारी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधितांवर केली जात आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागातही ATS कडून छापेमारी होत आहे. छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली या भागात छापेमारी सुरू आहे. गँगस्टर भट्टीशी संपर्कात असलेले, संपर्कात असल्याचा संशय असणारे एटीएसच्या रडारवर आले आहेत.
नवी मुंबईतून तिघांची चौकशी सुरू
शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियावर संपर्कात असलेल्या संशयातून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज राज्यभरात कारवाई केली आहे. नवी मुंबईतील काही जणांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. याप्रकरणी नवी मुंबईतून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संशयितांचं सोशल मीडिया तपासून, त्यांचे फोन तसंच इतर डिजीटल साधनं तपासून चौकशी केली जात आहे. या कारवाईचा मुख्य उद्देश गँगस्टर भट्टी याच्याशी संपर्कात असल्याबाबत डिजीटल पुरावे गोळा करणं हा आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही ATS ची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना इथे एटीएसने कारवाई केली आहे. ६ जणांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे शहजाद भट्टीच्या युजर आयडीवरुन संपर्क साधणाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्याच्या संपर्कात १४ जण असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र एटीएसकडून आज ११२ संशयीत लोकांची चौकशी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीडमध्येही एटीएस पथक दाखल होत त्यांनी कारवाई केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने बीडमधील वडवणी येथून गँगस्टर भट्टी याच्या सिंधीकेटशी संबंधांच्या संशयावरुन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. राँग नंबरवरुन कॉल आल्याने हा तरुन तपास यंत्रणेच्या रडारवर आला होता. मात्र काही आक्षेपार्ह बाब न आढळल्याने या तरुणाला चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे.