
तुम्ही कधी विचार केला आहे का की झोपूनही लाखो रुपये कमवता येऊ शकतात? मुंबईत राहणाऱ्या जिनीया चटर्जीने हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. जिनीयाने दोन महिने चाललेल्या एका खास स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा जिंकून तिने तब्बल 9.6 लाख रुपये आणि एक स्पॉन्सर्ड हॉलिडे ट्रिप मिळवली आहे. 'स्लीप इंटर्नशिप'साठी देशभरातून दोन लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले होते. या सर्वांमधून जिनीयाला भारताची 'स्लीप चॅम्पियन' म्हणून निवडण्यात आलं आहे.
वेकफिटने (Wakefit) आयोजित केलेल्या या इंटर्नशिपमध्ये काही नियम होते. यात झोपेला प्राधान्य देणं, झोपेचं वेळापत्रक पाळणं आणि दर आठवड्याला एका मजेदार चॅलेंजमध्ये भाग घेणं गरजेचं होतं.
दोन लाखांहून अधिक अर्जांमधून चाचण्या आणि मुलाखती घेऊन फक्त दहा जणांची स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा सुमारे 60 दिवस चालली. यात प्रत्येकाच्या झोपेचा दर्जा आणि कामगिरी तपासली गेली. दररोज मिळणाऱ्या गुणांच्या आधारे लीडरबोर्डवर स्पर्धकांचं स्थान ठरवलं गेलं.
पण या स्पर्धेचा उद्देश फक्त पुरेशी झोप घेणं हा नव्हता. स्पर्धकांना वेगवेगळ्या आणि मजेदार टास्कमधून त्यांची कल्पकता दाखवण्याची संधीही मिळाली.
वेगवेगळी आव्हाने
दर आठवड्याला स्पर्धकांना वेगवेगळे टास्क दिले जायचे. यातील एक टास्क होता 'स्लीप सिनेमा'. यात झोपेशी संबंधित प्रसिद्ध चित्रपटांमधील दृश्ये पुन्हा साकारायची होती. 'स्लीप बिंगो' नावाच्या आणखी एका चॅलेंजमध्ये स्पर्धकांना त्यांच्या स्वतःच्या आठवड्याभराच्या झोपेच्या सवयी तपासायच्या होत्या.
यातील सर्वात मजेदार चॅलेंज होतं 'अंडरकव्हर स्लीप मिशन'. यात स्पर्धकांना संभाषणादरम्यान इतरांच्या लक्षात न येता 'ब्लँकेट' किंवा 'पिलो' हे शब्द दहा वेळा वापरायचे होते. दर आठवड्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला 'प्रो स्लीपर ऑफ द वीक' म्हणून गौरवण्यात आलं. दोन महिने चाललेल्या या स्पर्धेच्या शेवटी जिनीया चटर्जी, रत्नागिरी मणिकंदन आणि मेहेक खोट यांनी पहिले तीन क्रमांक मिळवले.
'बिग बेड' नावाच्या ग्रँड फिनालेमध्ये दोन मुख्य आव्हाने होती.
पहिलं आव्हान होतं 'मेमरी फोम चॅलेंज'. यात दिलेल्या चित्रांसारखी बेडरूम तयार करायची होती. याद्वारे स्पर्धकांची निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती आणि टीमवर्क तपासलं गेलं.
दुसरं आव्हान होतं 'स्लीप ऑक्शन'. यात चांगल्या झोपेसाठी लागणाऱ्या उशा, ब्लँकेट्स, एसीचे रिमोट, लाईट आणि आवाजाची सेटिंग या गोष्टी लिलावात मिळवायच्या होत्या.
यानंतर प्रत्येक स्पर्धकाने त्यांना दिलेल्या जागेवर शेवटची रात्र घालवली. त्या रात्रीच्या झोपेच्या गुणांवरून विजेता ठरवला गेला. यात जिनीया चटर्जीने पहिला क्रमांक मिळवला. या विजयामुळे तिला 9.6 लाख रुपये आणि वेकफिट स्पॉन्सर्ड हॉलिडे ट्रिप मिळाली.