
शुक्रवारी रात्री मुंबई लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणादरम्यान एक प्रवासी चालत्या ट्रेनमधून बाहेर पडला, पण सुदैवाने तो बचावला. ही घटना रात्री १०:३० च्या सुमारास चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये घडली. ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभे राहण्यावरून हा वाद सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. या शाब्दिक वादाचं रूपांतर नंतर भयंकर हाणामारीत झालं.
या हाणामारीच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन प्रवासी एकमेकांना मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. मार चुकवण्यासाठी मागे सरकताना त्यातील एकाचा तोल गेला आणि तो ट्रेनमधून खाली पडला.
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये उभे राहण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद, एक प्रवासी मुंबई सेंट्रल प्लॅटफॉर्मवर पडला. शुक्रवारी रात्री धावत्या फास्ट लोकल ट्रेनमध्ये ही हाणामारी झाली. रात्री १०:३० च्या सुमारास ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. ट्रेन मुंबई सेंट्रलला पोहोचत असताना एकाचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला.
— Siraj Noorani (@sirajnoorani) November 7, 2026
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान धावत्या ट्रेनमध्ये डब्याच्या दारात उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचं रूपांतर लगेचच फ्री स्टाईल हाणामारीत झालं.
ट्रेन मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ पोहोचत असताना ही हाणामारी अधिकच वाढली. यामुळे एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो दरवाज्यातून थेट प्लॅटफॉर्मवर पडला. स्टेशनवर येत असल्याने ट्रेनचा वेग कमी होता, त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि या प्रवाशाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.