
मुंबई : मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन, पण याच लाईफलाईनमधला प्रवास किती जीवघेणा ठरू शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून एक महिला खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान घडली आणि या घटनेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास करत होती. दिवा आणि मुंब्रा दरम्यान ट्रेन सिग्नलवर थांबली होती. सकाळच्या गर्दीच्या वेळेमुळे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती आणि दरवाज्याजवळ प्रवाशांना उभं राहायलाही जागा नव्हती.
व्हायरल व्हिडिओ येथे पाहा:
#Thane
A woman commuter escaped with minor injuries after falling from overcrowded local train onto tracks between Diva and Mumbra stations.The train was halted at a signal when incident occurred, triggering panic among passengers.#Thane#Railway#RailwaySafety#Maharashtra… pic.twitter.com/vv1HuEJxJD— Goldy Srivastav (@GoldySrivastav) September 10, 2026
ही महिला दरवाज्याजवळ उभी असताना गर्दीच्या दाबामुळे तिचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून खाली पडली. सुदैवाने, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा ट्रेन सिग्नलला थांबली होती, त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, ती रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या एका गटारात पडली आणि तिला किरकोळ दुखापत झाली.
या घटनेचा व्हिडिओ काढण्यात आला होता, जो आता सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. गर्दीने भरलेल्या लोकलमधून महिला पडतानाचे हे दृश्य पाहून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि मुंबई लोकलच्या जीवघेण्या गर्दीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेमुळे गर्दीच्या वेळी होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा यांसारख्या भागांतून मुंबईकडे येणाऱ्या सकाळच्या लोकलमध्ये अक्षरशः माणसांचे लोंढे प्रवास करतात, ज्यामुळे डब्यांच्या आत आणि दरवाज्यांवर प्रचंड गर्दी होते.
ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभं राहणं किंवा लटकून प्रवास करणं धोकादायक असलं तरी, प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना आत सरकायलाही जागा नसते. त्यामुळे या ताज्या घटनेने प्रवासी सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाकडे अधिक लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ट्रेन थांबलेली असल्यामुळे या महिलेचा जीव वाचला, हे तिचं नशीबच म्हणावं लागेल. पण या व्हायरल व्हिडिओने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या धोक्यांकडे आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.