Privacy Row : 'कपडे नीट घाला', मुलींच्या PG मध्ये मालकाने लावला CCTV; मुंबईतील प्रकाराने पेटला वाद

Published : Sep 09, 2026, 02:28 PM IST
Privacy Row : 'कपडे नीट घाला', मुलींच्या PG मध्ये मालकाने लावला CCTV; मुंबईतील प्रकाराने पेटला वाद

सार

मुंबईत एका घरमालकाने मुलींच्या PG मध्ये त्यांच्या परवानगीशिवाय थेट लिव्हिंग रूममध्येच CCTV कॅमेरा लावला. इतकंच नाही, तर 'नीट कपडे घाला' असा सल्लाही दिला.

मुंबई : मुंबईत मुलींच्या एका PG मध्ये थेट लिव्हिंग रूममध्येच CCTV कॅमेरा लावल्याने प्रायव्हसीवरून (गोपनीयतेच्या अधिकारावरून) एक नवीन वाद सुरू झाला आहे. या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणीच्या म्हणण्यानुसार, घरमालकाने त्यांच्या परवानगीशिवाय किंवा पूर्वकल्पना न देताच हे कृत्य केलं. इतकंच नाही, तर कॉमन एरिया वापरताना 'नीट कपडे घाला' असा सल्लाही दिला.

या तरुणीने Reddit वर एक पोस्ट लिहून आपला अनुभव सांगितला आहे. तिच्या मते, ती शहरातल्या एका 3 BHK PG मध्ये इतर सहा मुलींसोबत राहते. घरमालकाने अचानक त्यांच्या कॉमन लिव्हिंग रूममध्ये CCTV कॅमेरा लावला. तिने लिहिलं, "आम्ही सात मुली एका पीजीमध्ये राहतो. आज सकाळी घरमालक दारावर आला आणि त्याने लिव्हिंग रूममध्ये CCTV कॅमेरा लावल्याचं सांगितलं. त्याच्या मते, हीच 'परवानगी' घेण्याची पद्धत आहे."

जेव्हा त्या तरुणीने घरमालकाला याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने पोलिसांच्या आदेशाचं कारण दिलं. यावर ती म्हणते, "CCTV घराच्या बाहेरही सहज लावता आला असता, त्यासाठी फक्त शेजाऱ्यांकडून NOC घ्यावी लागली असती. पण मला वाटतं की तेवढे कष्ट घेण्याची त्याची इच्छा नव्हती."

तिने आपल्या पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे की, जेव्हा त्या लिव्हिंग रूममध्ये येतात, तेव्हा त्यांना 'नीट कपडे घालण्यास' सांगितलं जातं. तिने स्पष्ट केलं की, त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये टेबल नसल्यामुळे, जेवण्यासाठी आणि अभ्यासासाठी त्या हॉलचाच वापर करतात. "आम्हाला प्रायव्हसीचा अधिकार नाही का? हा फक्त नीट कपडे घालण्याचा प्रश्न नाही," असं तिने म्हटलं आहे.

जेव्हा मुलींनी जास्त विचारपूस केली, तेव्हा घरमालकाने सुरक्षेचा मुद्दा काढला. तसेच, भाडेकरू मित्र-मैत्रिणींना घरात आणतात आणि वस्तू गायब होतात, असंही तो म्हणाला. अशा घटनांनंतर पोलिसांनी CCTV फुटेज मागितल्याचंही त्याने नमूद केलं.

व्हायरल पोस्ट पाहा

ती तरुणी पुढे म्हणते, “आम्ही कॉलेजमध्ये आहोत किंवा नुकत्याच नोकरीला लागलो आहोत, म्हणून या लोकांनी आमच्यावर काहीही लादावं आणि आम्ही ते ऐकून घ्यावं का? मी त्याला कॅमेरा बाहेर लावण्याबद्दल समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो 'बघू' म्हणाला. मुंबईत असा अनुभव येईल असं कधीच वाटलं नव्हतं; हा एक नवीन नीचांक आहे."

इंटरनेटवर काय प्रतिक्रिया?

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रायव्हसीच्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक युझर्सनी त्या तरुणीला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला, तर काहींनी जागा सोडून दुसरीकडे राहण्याचा सल्ला दिला.

एका युझरने म्हटलं, “लिव्हिंग रूममध्ये स्पष्ट परवानगीशिवाय CCTV कॅमेरा लावणं हे गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे आणि घरमालक भाड्याच्या खासगी जागेत अशाप्रकारे पाळत ठेवण्याची सक्ती करू शकत नाहीत." दुसऱ्याने लिहिलं, “हे बेकायदेशीर आहे. पोलिसात तक्रार करा. हे प्रकरण सोडू नका.”

“हे तर कायदेशीरच नाही; त्यांच्या नकळत असं केल्याबद्दल घरमालकावर कारवाई होऊ शकते,” असं आणखी एका व्यक्तीने म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Security Breach : PMO चे बनावट अधिकारी बनून मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरी, बंदूकधारी अटकेत
Work From Home : ऑफिसमध्ये बसून जास्त काम होतं हा गैरसमज; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल