Mumbai Weather Forecast : मुंबईत पुढील २४ तासात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Weather Forecast : रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 8, 2024 6:53 AM IST

Mumbai Weather Forecast : मुंबई शहर आणि उपनगराला रात्री १ ते सकाळी ७ या दरम्यान पावसाने झोडपून काढले आहे. सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील तीन तास शहरासह उपनगरामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. तसंच पुढील २४ तासांत शहरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. रात्रभरात झालेला पाऊस आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईकरांनी शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळणंच आवश्यक आहे.

शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय

मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सोमवारी दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वे वाहतुकीवर कसा झाला परिणाम?

मुंबईसह उपनगरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती. ठाणे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान नाहूर भांडुप कुर्ला सायन या स्थानकांच्या जवळ आठ इंचापेक्षा जास्त पाणी साचले होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने हे पाणी आता कमी झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे. ठाण्यावरून सीसीएमटीकडे आणि सीएसएमटीकडून ठाण्याकडे लोकल सोडण्यात आलेले आहेत. भांडुप स्थानकात सर्वाधिक पाणी साचले होते मात्र आता या ठिकाणी पाणी पूर्णतः वाहून गेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आणखी वाचा :

Mumbai Rain Local Train Updates : मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकल सेवा विस्कळीत, पश्चिम-मध्य-हार्बर रेल्वेवर सध्या परिस्थिती जाणून घ्या

Raigad Rain : किल्ले रायगडावर पावसाचं रौद्ररुप VIDEO, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले

 

 

Share this article