
Mumbai Rain Local Train Updates: मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सकल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील लोकल सेवेवर देखील झाला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील सर्व लोकल गाड्या सधा उशीराने धावत आहे.
ठाणे, गोरेगाव, मानखुर्द पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक सकाळी सहा वाजता ठप्प झाली होती. आठ वाजल्यानंतर लोकल पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या लोकल 30 ते 40 मिनिटं उशीराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशीराने धावत आहे. मात्र सर्व लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. हार्बर रेल्वे अजूनही पूर्णपणे ठप्प आहे. तसेच पाऊस अजून काही तास कोसळत राहिल्यास मुंबईतील परिस्थिती अतिशय बिकट होऊ शकते.
हार्बर रेल्वेसेवा ठप्प, मध्य रेल्वेही विस्कळीत
मुंबईतील मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई-ठाणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली, मात्र, ही वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी जमली आहे. तर दुसरीकडे हार्बर रेल्वेमार्गावर चुनाभट्टी मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावर अनेक ट्रेन्स एकापाठोपाठ रुळांवर उभ्या आहेत. या सगळ्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.
मुंबईतील शाळांना सुट्टी
सोमवारी दिवसभर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या (सकाळच्या )सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाच्या परीक्षेचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा :