Mumbai Third Airport : मुंबई महानगर प्रदेशात तिसरे विमानतळ उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून, सरकार पालघर, विरार या संभाव्य ठिकाणांचा अभ्यास करतय. वाढती प्रवासीसंख्या, तिसरी मुंबई विकसित करण्याच्या उद्दिष्टाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणारय.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळानंतर आता मुंबई महानगर प्रदेशात तिसरे विमानतळ उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भविष्यात वाढणारी प्रवासीसंख्या आणि नवी मुंबई विमानतळाला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता राज्य सरकार हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला हे तिसरे विमानतळ पालघर जिल्ह्यात उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता विरारसह इतर संभाव्य ठिकाणांचाही सखोल अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
25
मुंबईजवळ तिसऱ्या विमानतळाची चाचपणी सुरू
राज्य सरकारकडून विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणांचा तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे. वाहतूक सुलभता, भविष्यातील विस्तार, दळणवळणाची जोडणी आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने कोणते ठिकाण अधिक योग्य ठरेल, यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, तज्ज्ञांचे मत आणि तांत्रिक अहवाल लक्षात घेऊनच सरकार पुढील पाऊल टाकणार आहे. ते नालासोपारा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
35
विरार की पालघर? दोन्ही ठिकाणांचे फायदे काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, विरारमध्ये विमानतळ उभारल्यास तो कोस्टल रोडच्या माध्यमातून प्रस्तावित वाढवण बंदराशी थेट जोडता येईल, ज्यामुळे वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होईल. पालघरमध्ये विमानतळ झाल्यास, वसई–विरार परिसर, विमानतळ आणि बंदर यांच्यातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करता येईल. दोन्ही पर्यायांमधील फायदे-तोटे तपासून सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे सरकार हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी सकारात्मक आहे. पालघर आणि वसई–विरार भागात बंदर, विमानतळ, बुलेट ट्रेनसारख्या भव्य पायाभूत सुविधा उभारून ‘तिसरी मुंबई’ विकसित करणे हे सरकारचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.
55
नवी मुंबई विमानतळावर नेटवर्कचा खोळंबा
दरम्यान, नवी मुंबई विमानतळावर सध्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्कच्या गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. टर्मिनलच्या आत नेटवर्क अत्यंत कमकुवत असल्यामुळे कॉल तुटणे, इंटरनेट न चालणे आणि ॲपद्वारे होणारी पेमेंट्स फेल होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना संपर्कासाठी आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी विमानतळाच्या मोफत वाय-फायवरच अवलंबून राहावे लागत आहे.