
मुंबई: मुंबई आणि उपनगरात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्याचा अर्थ आहे. अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता, जी शहराच्या सामान्य जीवनावर गंभीर परिणाम करू शकते.
आज सकाळपासूनच मुंबईच्या अनेक भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे या उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक असून, रस्ते ओलेचिंब झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांची गती मंदावली आहे. वाकोला पुलावरील रस्ता चाळण झाल्याचे दृश्य दिसत आहे. वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही भागांत खड्डे आणि पावसाचे पाणी एकत्र आल्यामुळे वाहनचालकांचे हाल सुरू आहेत.
सध्या मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सुरू असली, तरी काही अडथळे जाणवायला सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेवर गाड्या १० मिनिटे उशीराने धावत आहेत. पश्चिम आणि हार्बर रेल्वे सध्या वेळेत आहेत. मात्र पावसाचा जोर असाच राहिला, तर लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. चाकरमान्यांसाठी हे अत्यंत काळजीचे क्षण आहेत. पावसामुळे स्टेशन्सवर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवामान विभागाच्या अलर्टनुसार, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या सागरी किनारपट्टीच्या भागांमध्ये 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील जलक्रीडा आणि पर्यटन तत्काळ थांबवण्याचे आदेश राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिले आहेत. हा इशारा पुढील २४ तास लागू असणार असून, नागरिकांनी शक्यतो किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शक्य असल्यास घरातच थांबा
मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा, आणि नेटवर्क चालू आहे का याची खात्री करा
अत्यावश्यक वस्तूंचा साठा ठेवा (पाणी, मेणबत्त्या, औषधे)
रेडिओ / न्यूज अपडेट्सवर लक्ष ठेवा
अफवांपासून दूर राहा, फक्त अधिकृत सूत्रांची माहिती घ्या
समुद्रकिनाऱ्यापासून दूर रहा
अंधेरी पूर्व/पश्चिम
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)
घाटकोपर, सायन, चेंबूर
पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ईस्टर्न एक्स्प्रेस वे
लोअर परळ, दादर, माटुंगा
अनावश्यक प्रवास टाळा
अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
घराबाहेर पडताना रस्त्यांची स्थिती तपासा
पावसाचे आगमन आनंददायी असले तरी, अशा मुसळधार स्थितीत सजगता आणि सुरक्षितता अत्यंत आवश्यक आहे. हवामान खात्याने दिलेला रेड अलर्ट केवळ इशारा नाही, तर काळजी घेण्याची वेळ आहे.