
मुंबई: मुंबईतील प्रतिष्ठित साठ्ये कॉलेजमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच रहस्यमय घटना समोर आली आहे. कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवलं आहे. संध्या पाठक असं या दुर्दैवी विद्यार्थिनीचं नाव असून ती स्टॅटिस्टिक्सच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याची शक्यता तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या पाठक नेहमीप्रमाणे आज सकाळी कॉलेजमध्ये आली होती. पण अचानक सकाळीच तिने कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. कॉलेज प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. कॉलेजच्या माहितीनुसार, संध्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. परंतु, संध्याच्या कुटुंबियांना मात्र हे मान्य नाही. "आमची मुलगी असे कधीच करू शकत नाही, तिचा घातपात झालेला असू शकतो," अशी भीती आणि संशय पाठक कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील एक नामांकित कॉलेज असलेल्या साठ्ये कॉलेजमध्ये अशा प्रकारे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, संध्या पाठकने खरंच आत्महत्या केली की तिच्या मृत्यूमागे काही वेगळे कारण आहे, याचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.