
मुंबई : मुंबईतील कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता कायम ठेवण्यासााठी मुंबई पोलिसांनी शहरात 15 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. सदर आदेश 9 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 23 सप्टेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी असणार आहे. तसेच मिरवणुका काढण्यास निर्बंध असणार आहेत. याशिवाय मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, बँड आणि फटाक्यांचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 मधील कलम 37(3) आणि 10(2) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता भंग होणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तसेच नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहावेत, यासाठी काही कार्यक्रम आणि उपक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी आणि अंत्ययात्रा यांना निर्बंध लागू होणार नाहीत. तसेच कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका, क्लब, संस्था आणि संघटनांचे नियमित कामकाज यांनाही सूट देण्यात आली आहे.
याशिवाय थिएटर, नाट्यगृह आणि मनोरंजनाच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रम, न्यायालयीन कामकाज, सरकारी व निमशासकीय कार्यालयांमधील अधिकृत कामकाजासाठी होणारी गर्दी आणि शाळा-महाविद्यालयांतील नियमित शैक्षणिक उपक्रमांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच कारखाने, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांचे नियमित कामकाजही सुरू राहणार आहे.
या आदेशातून विशेष परवानगी मिळालेल्या सभा किंवा मिरवणुकांना सूट मिळू शकते. संबंधित विभागाचे पोलिस उपायुक्त किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आवश्यकतेनुसार अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ शकतात. यामुळे नियोजित कार्यक्रम किंवा मिरवणुकीसाठी संबंधित पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे.
प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर आदेशाची मुदत संपल्यानंतरही या कालावधीत सुरू झालेली तपास प्रक्रिया, कायदेशीर कारवाई किंवा दंडात्मक प्रक्रिया सुरू राहू शकते असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच 23 सप्टेंबरनंतर आदेशाची मुदत संपली तरी त्यापूर्वी झालेल्या उल्लंघनावरील कारवाई संपणार नाहीये.