
मुंबई : मुंबईत शनिवारी दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. मालवणीतील चिकूवाडी परिसरात वीटांचा खांब कोसळून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील विविध भागांत दहीहंडी फोडताना झालेल्या अपघातांमध्ये तब्बल ३७६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
चिकूवाडी, मालवणी येथील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये शनिवारी दुपारी काही मुले स्वतःहून दहीहंडी साजरी करत होती. त्यांनी एका बाजूला झाडाला, तर दुसऱ्या बाजूला घराच्या वीटांच्या खांबाला दहीहंडीची दोरी बांधली होती. हंडी फोडताना निर्माण झालेल्या दबावामुळे वीटांचा खांब कोसळला आणि त्याखाली सात वर्षांचा मुलगा दबला गेला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.
दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना आणि हंडी फोडताना मुंबईत एकूण ३७६ गोविंदा जखमी झाले. यापैकी सर्वाधिक १८३ जखमींची नोंद मुंबई शहरातील रुग्णालयांमध्ये झाली. पश्चिम उपनगरांत १२६, तर पूर्व उपनगरांत ६२ जखमींवर उपचार करण्यात आले.
महापालिकेच्या माहितीनुसार, जखमींपैकी ५३ जण रुग्णालयात दाखल होते, तर ३७ जणांवर उपचार सुरू होते. दरम्यान, २८६ जखमी गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. केईएम रुग्णालयात सर्वाधिक जखमी झाल्याची माहिती आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव शनिवारी महाराष्ट्रभर उत्साहात पार पडला. गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्यात आली. मात्र, मुंबईतील अपघातांमुळे उत्सवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.