
Mumbai : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने तेथील ठिकाणाची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी दौरा केला. यावेळी त्यांच्या शेजारी असणारा एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याचे दिसले. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर नागरिकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अशातच मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीची चौकशी होणार असल्याचे आता बोलले जात आहे.
मुंबईतील गांधी मार्केट परिसरात पावसामुळे साचलेल्या पाण्याची पाहणी सुरू असताना महापालिकेचे मुकादम बाबन जाधव उघड्या ड्रेनमध्ये पडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता नवे प्रश्न उपस्थित झाले असून महापौर रितू तावडे यांनी हा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमके कोणत्या परिस्थितीत ही घटना घडली, सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये हलगर्जी झाली का, याचा तपास केला जाणार आहे.
घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी ड्रेनचे चेंबर उघडे होते त्या ठिकाणी आधीपासूनच सुरक्षेसाठी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांसह इतर कर्मचारी त्या मार्गाचा वापर न करता बाजूने जात होते. मात्र, संबंधित मुकादमाने बॅरिकेटिंग हटवून त्याच मार्गाने प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत महापौरांनी संशय व्यक्त केला आहे.
महापालिका प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असून ड्रेनचे चेंबर उघडे का ठेवण्यात आले होते, आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती का, तसेच बॅरिकेटिंग कोणी आणि का हटवले, याचाही तपास केला जाणार आहे. मुकादमाला चेंबर उघडे असल्याची माहिती होती का, याचाही तपास चौकशीदरम्यान केला जाणार आहे.
या घटनेत कोणाची निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीही महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.