
मुंबईतील मालाड परिसरात सार्वजनिक ठिकाणी जैन समाजाकडून मारल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वाद सध्या पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. राज ठाकरेंनी म्हटले की, "विनाकारण वाद निर्माण करू नका आणि कोणाच्याही राजकारणाला बळी पडू नका".
भेटीदरम्यान राज ठाकरे म्हणाले, "तुमची डोकी काही लोक मुद्दाम भडकवत आहेत. पण आमची डोकी भडकली तर परिस्थिती किती गंभीर होईल, याचाही विचार करा. तुमच्याकडे कोणी येत असेल तर त्यांच्यासाठी कार्पेट टाका, ते निघून गेल्यावर ते काढून टाका. मात्र सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून अनावश्यक वाद निर्माण करू नका."
पुढे राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत अनेक वर्षांपासून विविध समाजाचे लोक शांततेने एकत्र राहत आहेत. "गुजराती समाजही अनेक वर्षांपासून येथे राहतो. मग गेल्या काही वर्षांतच अशा गोष्टी का सुरू झाल्या?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी जैन समाजाला उद्देशून, "तुम्ही व्यापारी लोक आहात. व्यापार करा आणि शांततेने जगा. आजपर्यंत कोणी तुम्हाला अडवले आहे का? समाजात सलोखा टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे". तसेच, "जैन मुनी पूर्वीही विविध सोसायट्यांमध्ये येत होते. पण त्यावेळी अशा प्रकारचे पांढरे पट्टे मारले जात नव्हते. मग आता अशी गरज का निर्माण झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांपासून मालाडसह काही भागांत जैन समाजाकडून सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारले गेले. यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या प्रतिनिधींनी थेट राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. बैठकीत दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका मांडण्यात आली. मात्र राज ठाकरे यांनी समाजातील शांतता आणि परस्पर समन्वय कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.