
मुंबईतील एका ओला ड्रायव्हरचं नाव आहे मीर शेख. सध्या त्यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. झालं असं की, एका प्रवाशाचा महागडा आयफोन १६ त्यांच्या गाडीत राहिला होता. मुंबईच्या बीकेसी (BKC) मध्ये राईड पूर्ण झाल्यावर शेख यांच्या लक्षात आलं की गाडीत फोन आहे. पण अडचण अशी होती की, फोन मालकाशी संपर्क कसा साधायचा? शेख यांना आठवत होतं की ते प्रवासी एक ज्येष्ठ नागरिक होते. पण फोनवर कुणाचा कॉलही येत नव्हता आणि ओला ॲपवरूनही त्यांच्याशी संपर्क करणं अवघड जात होतं.
आता अशावेळी फोन तसाच सोडून देण्याऐवजी किंवा कुणीतरी संपर्क साधेल याची वाट बघण्याऐवजी, शेख यांनी तो फोन स्वतःकडे सुरक्षित ठेवला.
अखेर त्यांच्या संयमाचं फळ मिळालं आणि त्या प्रवाशाचा फोन आला. फोनवर बोलल्यावर कळालं की ते मलबार हिल परिसरात आहेत. मग शेख यांनी स्वतः गाडी चालवत तिथे जाऊन तो महागडा फोन परत करण्याचा निर्णय घेतला.
व्हिडिओमध्ये शेख म्हणतात, "अखेर मला कस्टमरचा फोन आला. माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. मला आता मलबार हिलला जावं लागेल, कस्टमर तिथेच आहेत. मी आता जाऊन त्यांचा फोन त्यांना परत देणार आहे."
instagram-media" data-instgrm-permalink="https://www.instagram.com/reel/Db2-m-lub6L/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14">
व्हिडिओमध्ये पुढे दिसतं की, शेख यांनी तो आयफोन त्याच्या मालकाला परत दिला. त्यांच्या या प्रामाणिकपणावर खुश होऊन त्या प्रवाशाने शेख यांना बक्षीस म्हणून तब्बल २,५०० रुपये दिले.
यावर शेख म्हणाले, "मी साहेबांना त्यांचा फोन परत दिला आणि साहेबांनी मला २,५०० रुपये दिले. मी याआधी एक व्हिडिओ बनवला होता की प्रामाणिकपणाचं फळ नेहमी असं मिळायला हवं. खूप खूप धन्यवाद, सर!"
ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोकांनी शेख यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करायला सुरुवात केली.
एका युझरने लिहिलं, "माणुसकी अजूनही जिवंत आहे. या प्रामाणिक ड्रायव्हरला सलाम."
तर दुसऱ्या एकाने कमेंट केली, "प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं."