
मुंबई : मुंबईतील वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (RTO) दोन सार्वजनिक बस आणि कारची एकमेकांना धडक बसून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये ५ जण आणि एका पाळीव कुत्र्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्याने दिली.
बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने (PRO) दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भक्ती पार्क ट्रॅफिक सिग्नलजवळ झाला. कुलाबा डेपोवरून गव्हाणगावकडे जाणारी बेस्टची बस लाल सिग्नलवर थांबली होती. तिच्या मागे दोन प्रवासी गाड्याही थांबलेल्या होत्या.
नेमक्या त्याच वेळी मागून येणाऱ्या 'चलो' ऑपरेटरच्या बसने सर्वात मागच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे एकामागोमाग एक अशा सगळ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या भीषण अपघातात दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यातली पुढची कार तर थांबलेल्या बेस्ट बसच्या मागच्या भागाखाली थेट घुसली होती.
या गाड्यांमध्ये बसलेले प्रवासी आतच अडकून पडले आणि त्यांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाड्या बाजूला करण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.
या भीषण अपघातात एकूण ५ लोक आणि एका पाळीव कुत्र्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी जखमींना तात्काळ बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवले. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.