Mumbai Monorail Service Restart Date: अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेसाठी आवश्यक तपासणी अंतिम टप्प्यात असून १० नव्या गाड्यांच्या समावेशासह मोनोरेल पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणारय.
मुंबई : मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल सेवा लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून, प्रवाशांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
25
मोनोरेल पुन्हा रुळावर येणार
संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) ते चेंबूर या मार्गावरील मोनोरेल सेवा गेल्या साडेचार ते सहा महिन्यांपासून बंद होती. मात्र आता ही मार्गिका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मोनोरेलच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट (ISA) ही महत्त्वाची तपासणी सध्या सुरू असून, ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
35
20 सप्टेंबरपासून सेवा बंद
मोनोरेलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने तसेच मार्गिकेवर नवीन यंत्रणा बसवण्यासाठी 20 सप्टेंबरपासून मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत जुनी प्रणाली काढून टाकून नवीन आणि अद्ययावत यंत्रणा बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याशिवाय, मोनोरेलच्या ताफ्यात 10 नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या चाचण्या सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहेत.
एमएमआरडीएने गेल्या आठवड्यात ISA अंतर्गत सुरक्षा तपासणी सुरू केली असून ती अजून काही दिवस चालणार आहे. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच, मोनोरेलसाठी CMRS (कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी) यांची स्वतंत्र तपासणीही होणार आहे. यासाठी निवृत्त अधिकाऱ्याची इंडिपेंडंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
55
संचालनासाठी नवीन कंत्राटदार
मोनोरेलच्या संचालन आणि देखभालीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. पॉवर मेक प्रोजेक्ट्स या कंपनीने सर्वात कमी म्हणजे 296 कोटी रुपयांची निविदा सादर केली असून, पुढील पाच वर्षांसाठी मोनोरेल चालवण्याचे कंत्राट या कंपनीला मिळण्याची दाट शक्यता आहे. मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाल्यास पूर्व मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.