Mumbai Metro : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई मेट्रो सज्ज; मध्यरात्रीनंतरही धावणार, २८ अतिरिक्त फेऱ्या

Published : Dec 31, 2025, 08:45 AM IST
Mumbai Metro

सार

Mumbai Metro : नववर्षाच्या उत्सवात मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रो-१ प्रशासनाने विशेष निर्णय घेतला आहे. घाटकोपर–वर्सोवा मार्गावर बुधवारी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत. 

Mumbai Metro : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले असतानाच सार्वजनिक वाहतुकीकडूनही खास तयारी करण्यात आली आहे. घाटकोपर–वर्सोवा–घाटकोपर ही मेट्रो-१ सेवा वर्षअखेरीच्या निमित्ताने बुधवारी मध्यरात्रीनंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नववर्षाच्या जल्लोषासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्यरात्रीनंतर २८ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या

मेट्रो-१ची नियमित सेवा दररोज पहाटे ५.३० ते रात्री ११.२६ या वेळेत सुरू असते. मात्र, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ११.२६ नंतर अतिरिक्त सेवा देण्यात येणार आहे. रात्री ११.२६ वाजता वर्सोवामधून घाटकोपरकडे, तर ११.५२ वाजता घाटकोपरमधून वर्सोवाकडे अतिरिक्त मेट्रो धावेल. गुरुवारी पहाटे २.१४ वाजता वर्सोवामधून आणि २.४० वाजता घाटकोपरमधून अखेरची मेट्रो रवाना होणार आहे.

अतिरिक्त सेवेदरम्यान वेळापत्रक कसे असेल?

या कालावधीत एकूण २८ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवार व गुरुवार पहाटेपर्यंत मेट्रो-१च्या एकूण फेऱ्यांची संख्या ५०४ इतकी होणार आहे. गर्दीच्या वेळेत दर तीन मिनिटे २० सेकंदांनी, तर कमी गर्दीच्या वेळेत पाच मिनिटे ५५ सेकंदांनी मेट्रो उपलब्ध असते. मात्र, अतिरिक्त सेवेदरम्यान दर १२ मिनिटांनी एक मेट्रो धावणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेडने दिली आहे.

नववर्षासाठी मुंबईकर सज्ज

दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर विविध ठिकाणी नियोजन करत आहेत. मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, वरळी यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. टेरेस रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सोसायट्यांमध्येही छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक वाढल्याने काही मुंबईकरांनी मढ, शहापूरसारख्या जवळच्या ठिकाणी जाण्याचा पर्याय निवडला आहे, तर युवा वर्ग मुंबईतील विविध पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक: अर्जाआधीच भाजपचा डबल धमाका, दोन प्रभागांत बिनविरोध विजय
Best Bus : थर्टीफर्स्टच्या रात्री मुंबईकरांसाठी बेस्ट सज्ज, ‘या’ मार्गांवर धावणार अतिरिक्त बस