
मुंबई : मुंबईत आगामी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्षांमध्ये समीकरणं जुळवाजुळवी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता ही भेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आले, तर मुंबईतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याआधी शिवसेना शिंदे गट आणि भाजप मनसेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती होती. मात्र आता ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्यावरून ही बैठक झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अलीकडेच लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबुतरखाना सुरू केला होता. तसेच मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबुतरखाना सुरू करण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून वाद पेटण्याची शक्यता असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबुतरखान्याला विरोध दर्शवला होता. त्यांनी कबुतरखान्यापेक्षा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यावे, असे भाष्य केले होते.
कबुतरखान्याबाबत जैन समाजाकडून सातत्याने मागणी होत आहे. मंगलप्रभात लोढा याही मागणीबाबत सकारात्मक असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेत मुंबईतील इतर समस्यांवरही संवाद झाल्याचे कळते, मात्र मुख्य मुद्दा कबुतरखाना हाच होता.