Mumbai Local: मध्य रेल्वेने कर्जत यार्डचे आधुनिकीकरण हाती घेतले असून लोकल ट्रेनच्या वेळेत १० मिनिटांची बचत होणारय. या प्रकल्पात अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंग प्रणाली, कर्जत-पलसदरी दरम्यान चौथी मार्गिका सुरू केल्याने लोकल वाहतूक सुरळीत व वेगवान होईल.
मुंबई: दररोज लाखो मुंबईकरांचा प्रवासाचा साथीदार असलेली लोकल ट्रेन आता आणखी वेगाने धावणार आहे! मध्य रेल्वेने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लोकलच्या गाड्या अधिक सुरळीत आणि वेळेवर धावतील.
या सुधारणा कर्जत यार्डच्या आधुनिकीकरणामुळे शक्य होत असून, या प्रकल्पामुळे प्रत्येक लोकलच्या वेळेत तब्बल १० मिनिटांची बचत होणार आहे. म्हणजेच मुंबईकरांचा मौल्यवान वेळ आता प्रत्यक्षात वाचणार!
26
कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, लोकल वाहतुकीत क्रांती
मध्य रेल्वेने कर्जत यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण सुरू केले आहे. या प्रकल्पावर अंदाजे ₹७४.५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
जुनी इलेक्ट्रिकल सिग्नलिंग प्रणाली पूर्णपणे बदलून त्याऐवजी अत्याधुनिक डिजिटल संगणक आधारित सिग्नलिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे सिग्नल बदलण्याची प्रक्रिया आता स्वयंचलित झाली असून, मानवी हस्तक्षेपाची गरज संपली आहे.
आता प्रत्येक गाडीचा ट्रॅक, हालचाल आणि सिग्नल बदलणे हे सर्व रिअल-टाईममध्ये संगणकाद्वारे नियंत्रित केले जाते. परिणामी, गाड्यांची थांबाठांब आणि विलंब कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.
36
कर्जत-पलसदरी दरम्यान ‘चौथी मार्गिका’, प्रवाशांसाठी गतीचा नवा अध्याय
या आधुनिकीकरण प्रकल्पात आणखी एक महत्त्वाची भर म्हणजे कर्जत आणि पलसदरी दरम्यान चौथी मार्गिका सुरू करण्यात आली आहे.
या नव्या लाईनमुळे मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांची वाहतूक वेगळी करण्यात आली आहे.
पूर्वी या दोन्ही प्रकारच्या गाड्या एकाच ट्रॅकवरून धावत असल्याने सिग्नलवर थांबावे लागत होते आणि वाहतूक मंदावत होती. आता मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध असल्याने लोकल गाड्या वेळेवर धावतील आणि गर्दी कमी होईल.
कर्जत यार्डमध्ये झालेल्या विविध सुधारणांमुळे त्याची एकूण क्षमता तब्बल २५ टक्क्यांनी वाढली आहे. पनवेलकडून येणाऱ्या मालगाड्यांना आता मुख्य लाईन ओलांडल्याशिवाय यार्डमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे गाड्यांची वाहतूक अखंड सुरू राहील आणि थांबा कमी होईल.
56
पूल आणि फूटओव्हर ब्रिजचाही विस्तार
कर्जत यार्डमधील विकासकामांमध्ये केवळ सिग्नलिंगच नव्हे, तर पायाभूत सुविधांचाही मोठा बदल करण्यात येत आहे.
यार्ड परिसरातील आठ पूलांचा विस्तार केला जात आहे, त्यापैकी दोन फूटओव्हर ब्रिज आधीच विस्तारित झाले आहेत.
तसेच खंडाळ्यातील नव्या फूटओव्हर ब्रिजचे गर्डर बसवण्याचे काम झपाट्याने सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार आहे.
66
मुंबईकरांचा वेळ आता खरोखर वाचणार!
मध्य रेल्वेचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकल गाड्यांचा वेग वाढेल, विलंब कमी होईल आणि प्रवाशांचा दररोजचा प्रवास अधिक सुसह्य होईल.
आता मुंबईकरांना “लेट लोकल” हा शब्द ऐकावा लागणार नाही. कारण लोकल होणार आहे सुसाट आणि वेळेवर!