
Mumbai Local : मुंबईसह उपनगरी रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आतापर्यंत UTS मोबाइल ॲपवरून लोकल ट्रेनचा मासिक पास काढण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र ही सुविधा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आली असून, यापुढे नवीन मासिक पाससाठी प्रवाशांना ‘Rail One’ या नव्या ॲपचा वापर करावा लागणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, UTS ॲपवरून यापूर्वी काढलेले मासिक पास त्यांचा वैध कालावधी संपेपर्यंत ग्राह्य राहतील. मात्र, नवीन पास काढण्यासाठी UTS ॲपचा पर्याय आता उपलब्ध नसेल. त्यामुळे आगामी प्रवासासाठी प्रवाशांनी ‘Rail One’ ॲप डाऊनलोड करून त्यावरूनच मासिक पास काढणे आवश्यक आहे.
रेल्वेच्या सर्व डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘Rail One’ ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपवरून अनारक्षित तिकिटे, मासिक पास, ऑनलाइन पेमेंट सुविधा आणि इतर रेल्वे संबंधित सेवा मिळणार आहेत. यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करण्याची गरज भासणार नाही आणि तिकीट प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘Rail One’ ॲपवरून अनारक्षित तिकिटे खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठी 3 टक्के सवलत जाहीर केली आहे. ही सवलत 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना डिजिटल माध्यमातून तिकीट खरेदीचा अतिरिक्त फायदा होणार आहे.
दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. ‘Rail One’ ॲपचा वापर वाढल्यास तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेत नवीन ॲपचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले आहे.