Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या वर्दळीच्या मार्गावर 'कवच' ही आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. ही स्वयंचलित प्रणाली अपघात टाळण्यासाठी आपोआप ब्रेक लावते.
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेली लोकल ट्रेन आता अधिक सुरक्षित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर ‘कवच’ ही आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचे काम जोरात सुरू असून या प्रकल्पातील सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि अपघातमुक्त होणार आहे.
विरार ते चर्चगेट या सुमारे 60 किलोमीटर लांबीच्या मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. वाढती गर्दी, लोकलची सुस्साट गती आणि तांत्रिक चुकांची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘कवच’ प्रणाली नेमकी काय आहे आणि ती लोकल प्रवासात कशी मदत करणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
25
काय आहे ‘कवच’ सुरक्षा प्रणाली?
कवच ही एक स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वेगाडीचा वेग, सिग्नलची स्थिती तसेच समोर धावणाऱ्या गाड्यांमधील अंतर यावर सतत नियंत्रण ठेवले जाते. चालकाकडून सिग्नल चुकून दुर्लक्षित झाला, वेग मर्यादेपेक्षा जास्त झाला किंवा अचानक धोका निर्माण झाला, तरी कवच प्रणाली आपोआप ब्रेक लावते. त्यामुळे समोरासमोर धडक होणे, सिग्नल तोडणे यांसारख्या गंभीर दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे.
35
प्रकल्पाची सध्याची स्थिती
या प्रकल्पांतर्गत 60 किलोमीटर मार्गावर टॉवर उभारणीसाठी आवश्यक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत टॉवर उभारणीचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले असून 15 पैकी 14 ठिकाणी माती परीक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 12 ठिकाणी पायाभरणीचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित बांधकामेही प्रगतीपथावर आहेत.
या संपूर्ण योजनेत 17 स्थानकांवर टीसीएएस (Train Collision Avoidance System) बसवण्यात येणार आहे. यापैकी सहा स्थानकांवरील काम पूर्ण झाले आहे. तसेच लिडार सर्वेक्षण, आरएफआयडी टॅग बसवणे आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे कामही सुरू आहे. प्रत्यक्ष परिस्थितीत प्रणालीची चाचणी घेतली जात असून आतापर्यंत 24 किलोमीटर मार्गावर इंजिन चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत.
55
मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित होणार
कवच प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित, नियंत्रित आणि आधुनिक होणार असून लाखो प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.