
Mumbai : दादरमधील कबुतरखान्यात अन्नावाचून मृत्यू पावलेल्या कबुतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जैन समाजाकडून मोठ्या प्रमाणावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये जैन मुनींनी आक्रमक भूमिका घेत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. “आमचेच आमदार, आमचेच खासदार असतील,” असे ठाम वक्तव्य करत त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही तयारी दर्शवली आहे.
या सभेमध्ये जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी सांगितले, “शांती दूत जनकल्याण पार्टीची आता मी घोषणा करतो. आमचेच आमदार असतील, आमचेच खासदार असतील. आता कबूतरच निर्णय घेणार—कोण सत्तेवर बसणार आणि कोण गाडीवर बसणार!”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “राजस्थानच्या सर्व कोम या पार्टीत असतील, फक्त चादर आणि फादर सोडून सगळे या पार्टीत असतील. आमच्या पार्टीचं चिन्ह कबूतर असेल. ही फक्त जैनांची नव्हे, तर गुजराती आणि मारवाडी समाजाचीही पार्टी असेल. महापालिकेत आम्ही आमचे उमेदवार उभे करू.”
जैन मुनींनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. ते म्हणाले, “आता आम्ही अल्टिमेटम देतो दिवाळीपर्यंत जर कोणताही निर्णय झाला नाही, तर आम्ही उपोषण करणार. ही लढाई फक्त कबुतरांची नाही, तर गोमातेसाठी देखील असेल. सरकारला माझा नाही, तर सनातन धर्माचा इशारा आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, ही आंदोलनात्मक भूमिका राजकारणासाठी नसून, धार्मिक श्रद्धा आणि जीवदयेच्या भावनेतून घेतली आहे.
सभेत मंगळप्रभात लोढा यांच्याबाबत विचारले असता, कैवल्य रत्न महाराज म्हणाले, “मंगलप्रभात लोढा हे जैन समाजाचेच नव्हे तर मुंबईचे नेते आहेत. ही सभा त्यांची नव्हती आणि त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही.” त्यांनी यावेळी सभेचा उद्देश फक्त कबुतरांना न्याय मिळवून देणे आणि जीवदयेचा संदेश पसरवणे हा असल्याचं स्पष्ट केलं.