CNG Price Hike : महागाईचा आणखी एक झटका! मुंबईत सीएनजी-पीएनजी दरवाढ, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता

Published : May 30, 2026, 09:30 AM IST
CNG Price Hike

सार

CNG Price Hike : महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत CNG आणि PNG च्या दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महागले असून आता त्याचा दर 86 रुपये प्रति किलो झाला आहे. तर PNG च्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांतील ही दुसरी दरवाढ असल्याने रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

CNG Price Hike : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता थेट सामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशभरात इंधन दरवाढीची मालिका सुरूच आहे. मागील 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाल्यानंतर आता CNG आणि PNG च्याही दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, रिक्षा-टॅक्सी चालक आणि गृहिणींचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.

मुंबईत CNG-PNG दरवाढ लागू

महानगर गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून नवे दर लागू केले आहेत. त्यानुसार CNG च्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत आता CNG 86 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार आहे. तसेच घरगुती पाईप गॅस म्हणजेच PNG च्या दरात प्रति SCM 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती PNG चा नवा दर 52 रुपये प्रति SCM झाला आहे.

15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी CNG दरवाढ आहे. यापूर्वी 13 मे रोजी देखील CNG च्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. लागोपाठच्या दरवाढीमुळे वाहनधारकांचे बजेट कोलमडत असून महागाईचा फटका अधिक तीव्र होत आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपूर आणि मुंबईतही CNG चे दर वाढल्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रिक्षा-टॅक्सी चालक अडचणीत

सततच्या इंधन दरवाढीमुळे मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. वाढत्या खर्चामुळे चालक संघटना पुन्हा एकदा भाडेवाढीच्या मागणीसाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. 13 मे रोजी झालेल्या पहिल्या दरवाढीनंतरच रिक्षा-टॅक्सी संघटनांनी प्रति किलोमीटर 1 रुपया भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. आता पुन्हा दरवाढ झाल्यामुळे ही मागणी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय संघर्षाचा थेट परिणाम

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव, तसेच होर्मुज सामुद्रधुनीवरील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती सातत्याने वाढताना दिसत आहेत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून वाहतूक क्षेत्रापर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसत आहे. आगामी काळात इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट