Weather Update : मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उकाड्याचा कहर कायम; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Published : May 28, 2026, 10:50 AM IST
Weather Update

सार

Weather Update : मुंबई आणि ठाण्यासह उत्तर कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक भागांमध्ये तापमान 38 अंशांच्या पुढे गेले असून दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, मान्सूनच्या आगमनालाही विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Weather Update : राज्यातील नागरिक सध्या प्रचंड उष्णतेमुळे त्रस्त झाले असून सर्वांच्या नजरा आता मान्सूनकडे लागल्या आहेत. मात्र पावसाचे आगमन अद्याप लांबणीवर पडल्याने उकाड्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणातील नागरिकांना दमट हवामान आणि वाढत्या तापमानामुळे अक्षरशः घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

मुंबई-ठाण्यात उष्णतेचा कहर

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई आणि ठाणे परिसरात आजही तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुढील काही दिवस तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नसल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर कोकणात उकाड्याचा तडाखा आणखी वाढला असून मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक भागांत तापमान 38 अंशांच्या पुढे

सध्या मुंबईतील तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. कुलाबा येथे 35.2 अंश तर सांताक्रूझमध्ये 35.1 अंश तापमानाची नोंद झाली आहे. भायखळा येथे 37.8 अंश तर राम मंदिर परिसरात तब्बल 38.7 अंश तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय विक्रोळी, वरळी आणि चेंबूर भागातही तापमान 36 अंशांच्या पुढे गेले आहे. दमट हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

सकाळच्या वेळेत वातावरण काहीसे गार वाटत असले तरी दुपारनंतर उन्हाचा तडाखा तीव्र होत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे उकाड्यात अधिक वाढ होत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि शरीराला थंड ठेवण्याची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मान्सूनपूर्व पावसालाही विलंब

मान्सूनपूर्व पावसाला झालेल्या विलंबामुळे उष्णतेचा त्रास आणखी वाढला आहे. दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज फोल ठरला आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन आता लांबणीवर पडले आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी 2 ते 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यानंतर महाराष्ट्रात 8 ते 10 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना उकाडा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट