Mumbai Chemical Leak : मुंबईत सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, गुदमरून २ तरुणांचा मृत्यू

Published : Sep 28, 2026, 08:31 AM IST
Mumbai Chemical Leak : मुंबईत सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, गुदमरून २ तरुणांचा मृत्यू

सार

मुंबईतील एका सार्वजनिक शौचालयात केमिकल गळतीमुळे गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनानंतर ही घटना घडली. जवळच्याच एका इलेक्ट्रोप्लेटिंग कारखान्यातून हे केमिकल गटारात सोडल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

मुंबई : मुंबईत एका सार्वजनिक शौचालयात केमिकल गळतीमुळे गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेबद्दल माहिती देताना वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अब्दुल शेख यांनी एएनआयला (ANI) सांगितलं की, "परवा गणपती विसर्जनानंतर रात्री अडीचच्या सुमारास ८-१० जणांचा ग्रुप जेवण करून तिथेच बसला होता. त्यावेळी दोघांना लघवीला जायचं होतं, म्हणून ते जवळच्या सार्वजनिक शौचालयात गेले. बराच वेळ ते परतले नाहीत, तेव्हा इतरांनी जाऊन पाहिलं. दोघेही तिथे बेशुद्ध पडले होते.

पोलिसांना माहिती मिळताच दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तपासादरम्यान तिथे एक उग्र वास येत होता. चौकशीत असं समोर आलं की, जवळच एक छोटा इलेक्ट्रोप्लेटिंगचा कारखाना आहे, जिथे काही विशिष्ट रसायनांचा वापर होतो. तिथूनच ड्रेनेजमध्ये केमिकल सोडल्याचा संशय आहे, ज्यामुळे हा विषारी वायू पसरला. मृतदेहांचं पोस्टमार्टम झालं असून आम्ही एकाला ताब्यात घेतलं आहे."

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

सायन येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिकारी मधुरिमा जोशी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसंच, हवेची गुणवत्ता आणि प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी तिथे २४ तास चालणारं 'पॉल्युशन मॉनिटरिंग डिव्हाइस' बसवलं आहे.

मृतांची ओळख पटली, गळतीचं कारण समोर

मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर (पूर्व) येथील मृणालताई पुलाजवळ, पारशी पंचायत गेटसमोर ही घटना घडली. प्रभाकर धनीवर (२४) आणि भाविन देसाई (१८) अशी या मृत तरुणांची नावे आहेत. त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याबद्दल अधिक माहिती देताना झोन १२ चे डीसीपी गजानन राजमाने म्हणाले, "साई इलेक्ट्रोप्लेट नावाच्या दुकानातून हे केमिकल लीक झालं आणि गुदमरून या दोन तरुणांचा जीव गेला. नवीनचंद्र चावडा यांच्या मालकीचं हे दुकान आहे."

मित्राने सांगितला थरार

या घटनेचा थरार सांगताना मृतांचा मित्र रोहित वैरागी म्हणाला की, रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. जेवण झाल्यावर सगळे मित्र पुलाखाली गप्पा मारत बसले होते. "प्रभाकर आणि भाविन दोघेही वॉशरूमला गेले. अर्धा तास झाला तरी ते आले नाहीत. आम्ही त्यांना १५ ते २० वेळा फोन केले, पण त्यांनी उचलले नाहीत. म्हणून आम्ही बघायला गेलो," असं वैरागीने सांगितलं.

त्यांना कसं बाहेर काढलं हे सांगताना तो पुढे म्हणाला, “शौचालयाचा एक दरवाजा उघडा होता आणि आतमध्ये एक जण बेशुद्ध पडला होता. आम्ही त्याला बाहेर काढलं आणि लगेच रुग्णालयात नेलं. दुसरा दरवाजा आतून बंद होता. आम्ही तो तोडून दुसऱ्यालाही बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.”या भागात केमिकल गळतीचा प्रभाव किती भयंकर होता, हे सांगताना वैरागीने त्याच्या अंगावर आलेले रॅशेस दाखवले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : नुसता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत, आदित्य ठाकरेंची टीका
Viral Video : 'मुंबई की दुबई?' 15 दिवसांतच दुबईला परतली तरुणी, पगार आणि खर्चावरचा व्हिडिओ व्हायरल