
मुंबईत पुन्हा एकदा गुन्हेगारी सावट गडद होत असल्याचं दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं पुन्हा सेलिब्रिटी आणि मोठ्या व्यावसायिकांना लक्ष्य करण्याची तयारी केली होती, असा धक्कादायक खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या कटानंतर आता या गँगने आणखी मोठं कांड करण्याचा प्लॅन आखल्याचं तपासात उघड झालं आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्यावर याआधीही धमक्यांचा पाऊस पडलेला आहे आणि तो अजूनही बिश्नोई गँगच्या टार्गेटवर असल्याचं पोलिस सूत्रांकडून समजतंय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गँगनं पुन्हा सक्रिय होत, मुंबईत मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवला होता. हे प्रकरण उघडकीस येण्याआधीच मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत कट उधळून लावला.
मुंबईतील अंधेरी परिसरातून अलीकडेच अटक करण्यात आलेल्या पाच शूटरकडून पोलिसांनी सात बंदुका आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या पाच जणांमध्ये एक आरोपी विकास ठाकूर याने चौकशीत कबुली दिली की तो थेट बिश्नोई गँगच्या संपर्कात होता.
पोलीस तपासात उघड झालं की अनमोल बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ याच्या सूचनेनुसार हे पाच जण मुंबईत दाखल झाले होते. त्यांना मुंबईत एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं आणि त्यासाठी 50 लाख रुपयांची सुपारी दिली जाणार होती, हेही समोर आलंय. मात्र हल्ल्यापूर्वीच पोलिसांनी या पाच जणांना अटक केली आणि संभाव्य हत्येचा कट हाणून पाडला.
अटक करण्यात आलेले पाच आरोपी आहेत
विकास ठाकूर उर्फ विक्की
सुमित कुमार दिलावर
श्रेयस यादव
देवेंद्र सक्सेना
विवेक गुप्ता
हे सर्व आरोपी राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, त्यातील सुमित आणि विकास हे हिस्ट्रीशीटर आहेत.
या घटनेनंतर मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि सेलिब्रिटींमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सततच्या धमक्यांमुळे आणि मोठ्या शस्त्रसाठ्याच्या पार्श्वभूमीवर आता सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. पोलिसांनी वेळेवर केलेली कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला असला, तरी अशा कटांचे धागेदोरे किती खोलवर गेले आहेत, याचा शोध घेणं गरजेचं ठरत आहे.