
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) निकाल काय लागणार? याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. मतदानानंतर समोर आलेल्या Axis My India च्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या अंदाजानुसार, मुंबईत भाजप-शिंदे युतीची लाट असून ठाकरे गटाला आपल्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Axis My India च्या सर्वेक्षणानुसार, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.
भाजप + शिवसेना (शिंदे गट): १३१ ते १५१ जागा (बहुमताचा आकडा पार)
मविआ (ठाकरे गट + शरद पवार गट): ५२ ते ६८ जागा
काँग्रेस + वंचित: १२ ते १६ जागा
इतर: ६ ते १२ जागा
केवळ जागाच नाही, तर मतांच्या टक्केवारीतही भाजपने मोठी झेप घेतल्याचे पोलमधून समोर आले आहे.
महायुती: ४२% ते ४४% मते
शिवसेना (UBT): ३२% ते ३५% मते
काँग्रेस: १३% ते १४% मते
विशेष म्हणजे, पुरुष आणि महिला मतदारांच्या पसंतीत फारशी तफावत नसून दोन्ही स्तरांवर महायुतीची पकड मजबूत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते.
निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे बंधूंनी 'मराठी माणूस', 'मराठी महापौर' आणि 'मुंबईचे अदाणीकरण' यांसारख्या भावनिक मुद्द्यांवर भर दिला होता. मात्र, एक्झिट पोलचे आकडे पाहता, हे मुद्दे मतदारांना खेचून आणण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. याउलट, भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी अधिक पसंती दिल्याचे दिसते.
एक्झिट पोल हे केवळ अंदाज असतात, अंतिम निकाल नाही. खरी चित्र मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी भाजप आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत.