मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ! रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला मंजुरी; १ सप्टेंबरपासून नवे दर लागू

Published : Aug 22, 2026, 11:17 AM IST
mumbai auto taxi fare hike new rates from 1st september 2026

सार

मुंबई महानगर प्रदेशात १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीचे नवे भाडेदर लागू होणार आहेत. रिक्षासह टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाल्यास प्रवाशांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) २० ऑगस्ट रोजी रिक्षा आणि टॅक्सीच्या सुधारित भाडेदरांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि पनवेलमधील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढणार आहे.

रिक्षाचे किमान भाडे २७ रुपये

नव्या दरानुसार रिक्षाच्या पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपये मोजावे लागतील. त्यामुळे लहान अंतराच्या प्रवासासाठीही प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे मीटर ३३ रुपयांपासून

काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यातही २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या ३१ रुपये असलेले किमान भाडे आता ३३ रुपये होणार आहे. त्यानंतरच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर ३३ रुपये दर लागू केला जाणार आहे.

मुंबईसह या भागांत नवे दर लागू

ही भाडेवाढ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि पनवेल या एमएमआरमधील भागांत १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. एमएमआरमध्ये यापूर्वीची मोठी रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ फेब्रुवारी २०२५ मध्ये लागू झाली होती. आता पुन्हा भाडेवाढ मंजूर झाल्याने नियमित प्रवाशांच्या मासिक प्रवास खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

चालक संघटनांकडून भाडेवाढीचे समर्थन

रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी या भाडेवाढीचे स्वागत केले आहे. वाढते इंधन दर, वाहनांची देखभाल, विमा आणि परवान्यांशी संबंधित खर्च यामुळे चालकांवरील आर्थिक दबाव वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनचे नेते थम्पी कुरियन यांच्या म्हणण्यानुसार, वाढत्या ऑपरेशनल खर्चाच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. रिक्षा चालकांनी सीएनजीचा दर सुमारे ८६ रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्याने दैनंदिन कमाईवर परिणाम होत असल्याचेही सांगितले.

टॅक्सी चालकांची अधिक भाडेवाढीची मागणी

टॅक्सी चालकांच्या संघटनांनी मात्र आणखी मोठ्या भाडेवाढीची मागणी केली होती. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे फ्रेडरिक डी'सा यांनी सांगितले की, संघटनेने टॅक्सीच्या सुरुवातीच्या भाड्यात किमान ४ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, एमएमआरटीएने अखेरीस २ रुपयांची वाढ मंजूर केली.

एमएमआरमध्ये किती रिक्षा-टॅक्सी?

एमएमआरमध्ये सध्या सुमारे ३ लाख नोंदणीकृत रिक्षा आणि ३० हजार टॅक्सी आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरपासून लागू होणारी ही भाडेवाढ मुंबई महानगर प्रदेशातील मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे. दरम्यान, चालकांच्या वाढत्या खर्चाचा विचार करताना प्रवाशांवरील वाढता महागाईचा भारही लक्षात घ्यावा, अशी भूमिका प्रवासी संघटनांनी घेतली आहे. चालकांचे आर्थिक हित आणि सर्वसामान्य प्रवाशांचा खर्च यामध्ये योग्य संतुलन राखण्याची मागणी करण्यात आली आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट