
Mumbai : मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानक येथे एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ही घटना त्यांच्या १३ वर्षांच्या मुलासमोर घडल्याने अधिकच धक्कादायक ठरली आहे.
मृत महिलेचे नाव पुष्पा गुप्ता असून आरोपी पती राजू गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या रामगड परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. या वादाला कंटाळून पुष्पा काही काळासाठी आपल्या माहेरी उत्तर प्रदेश येथे गेली होती. तिचा भाऊ कमलेश कुमार, जो भारतीय सैन्यात जवान आहे, त्याने मध्यस्थी करत तिला पुन्हा मुंबईत आणले होते.
१४ मार्च रोजी पुन्हा घरात वाद झाल्यानंतर पुष्पाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ती नातेवाईकांकडे जाण्यासाठी स्थानकात उभी होती. यावेळी तिचा भाऊ काही सामान घेण्यासाठी घरी गेला असताना, आरोपी राजूने त्याला घरातच कोंडून ठेवले आणि आपल्या मुलासह स्थानकात पोहोचला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर त्याने पत्नीला घरी परतण्यास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने घटस्फोटाची मागणी करताच संतापलेल्या राजूने तिला थेट धावत्या लोकलसमोर ढकलले.
घटनेनंतर आरोपी राजू गुप्ता दादरमार्गे विरार आणि तेथून सुरतला फरार झाला होता. मुंबई रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. सुरत गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या २० तासांत त्याला अटक करण्यात आली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कौटुंबिक वादातून इतका टोकाचा निर्णय घेतल्याने समाजातही चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः ही घटना अल्पवयीन मुलासमोर घडल्याने ती अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.