
मुंबई : दादर पश्चिमेला असलेल्या ५० मजली कोहिनूर स्क्वेअर इमारतीत सोमवारी सकाळी अचानक आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका हॉटेलच्या किचनमध्ये ही आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने (MFB) दिली आहे.सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला या घटनेचा कॉल आला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत, म्हणजे ९ वाजून २५ मिनिटांनी या आगीला 'लेव्हल-१' ची आग म्हणून घोषित करण्यात आलं.
अग्निशमन दलाने सांगितलं की, "शिवसेना भवनासमोर असलेल्या कोहिनूर स्क्वेअर या ५० मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर एका हॉटेलचं किचन आहे. तिथेच ही आग भडकली. सकाळी ०९:१८ वाजता आम्हाला माहिती मिळाली आणि ०९:२५ वाजता आम्ही याला लेव्हल-१ ची आग जाहीर केलं."
आगीची बातमी कळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट (BEST) कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), आरोग्य अधिकारी, १०८ रुग्णवाहिका आणि स्थानिक वॉर्डाचे कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी मिळून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कुणी जखमी झाल्याचं वृत्त नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास आता सुरू आहे. (ANI)