
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कालपासून (29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून, मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र झाला आहे. मनोज जरांगेंसोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.
राज्य सरकारचा मोठा निर्णय
आंदोलन सुरु असतानाच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
समितीच्या मुदतवाढीचा निर्णय
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 25 जानेवारी 2024 रोजी ही समिती गठीत केली होती. याआधी या समितीच्या कार्यकाळाला 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आला होता. यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाने केला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या या आंदोलनात लाखो मराठा बांधव दाखल झाले आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांसह सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि धडक कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
लाखो आंदोलक मैदानावर दाखल
आझाद मैदानावर उपोषणासाठी सुरुवातीला फक्त 5 हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात लाखो आंदोलक मैदानावर दाखल झाले आहेत. आंदोलकांची वाढती उपस्थिती लक्षात घेता पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली असून आंदोलकांशी समजूत काढण्याचाही प्रयत्न सुरु आहे.