
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन आता मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू झालं आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक ठप्प झाली आहे. सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी गाड्या अडवल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
बीएमसी समोर आंदोलकाची अंघोळ
मुंबई महापालिकेच्या (BMC) मुख्यालयासमोर आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे. याच ठिकाणी एका मराठा आंदोलकाने सर्वांसमोर अंघोळ करून आंदोलनाला अनोखा पाठिंबा दर्शविला. या कृतीमुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वेगळं स्वरूप मिळालं आहे.
आंदोलनासाठी लाखोंचा ओघ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून लाखो तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत. अनेकांनी रात्रभर प्रवास केला. सकाळी ट्रॅफिक जाममुळे गावाहून आणलेला शिधा रस्त्याच्या कडेला तयार करूनच नाश्ता केला. आंदोलकांचा उत्साह आणि जिद्द स्पष्टपणे जाणवत आहे.
"मुंबईकरांना त्रास नको" – जरांगे
आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, "आरक्षणाशिवाय माघार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही." मात्र, त्यांनी मुंबईकरांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहनही केलं. प्रत्येक वाहनचालकाने पोलिसांनी सांगितलेल्या जागीच गाडी लावावी, अशी सूचना त्यांनी दिली.
"दोन तासांत मुंबई मोकळी करायची"
जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संबोधित करताना सांगितलं, "आपण मुंबई जाम केली आहे, पण आता दोन तासांत मुंबई मोकळी करण्याची जबाबदारी आपलीच आहे." त्यांनी शांततेने आंदोलन करण्याचं आणि शिस्त पाळण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलं.