
मुंबई : मराठा समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित आरक्षणाच्या प्रश्नासाठी मुंबई आज पुन्हा एकदा संघर्षभूमी ठरली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. पोलिसांनी सुरुवातीला केवळ २९ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच परवानगी दिली होती. मात्र आंदोलनाचा वाढता उत्साह आणि शिष्टमंडळाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुदतवाढ मंजूर केली असून आता उद्या संध्याकाळपर्यंतची मुदत वाढून दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीपासूनच एक दिवसाची मुदत दिली असली तरी ते आपल्या निर्णयावर ठाम होते. "आरक्षण हा आमचा हक्क आहे" या भूमिकेतून त्यांनी उपोषण सुरूच ठेवले. आज सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानात जमले आहेत. आंदोलकांकडून शिस्तबद्ध व संयमी पद्धतीने आंदोलन केले जात असून यात सर्व वयोगटातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे.
मराठा आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानेदेखील सहकार्याची भूमिका घेतली आहे. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर संकेत मिळाले होते की मुदतवाढ दिली जाईल. अखेर ते संकेत खरे ठरले आहेत आणि आंदोलकांना आणखी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे.
मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील आंदोलकांचा उत्साह कमी झालेला नाही. पावसापासून बचाव करण्यासाठी काही आंदोलकांनी सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात आसरा घेतला आहे. पोलिसांकडूनही आंदोलकांना सहकार्य करण्यात येत आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीहून तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे. इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय स्तरावर आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला मराठा समाजाकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता पुढील काही दिवस मुंबई राजकीय दृष्ट्या अधिक तापण्याची चिन्हे आहेत. सध्या उपोषणाला मिळालेली मुदतवाढ आंदोलनकर्त्यांसाठी दिलासादायक असली तरी सरकार कोणते ठोस निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत मराठा समाजाचा संघर्ष नवा टप्पा गाठत आहे. पावसाचा अडथळा, प्रशासकीय आव्हानं असूनही आंदोलकांचा उत्साह ओसरणारा नाही. प्रशासनाने दिलेली मुदतवाढ आणि येणाऱ्या राजकीय घडामोडी लक्षात घेता पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.