Malad Station Murder : गणिताच्या प्राध्यापकांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून साक्षीदारांचा शोध, AI ची घेतली मदत

Published : Jan 31, 2026, 08:35 AM IST
Malad Station Murder

सार

Malad Station Murder : मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधील किरकोळ वादातून गणिताच्या प्राध्यापकाची हत्या झाली. आरोपी अटकेत असून हत्यार जप्त करण्यात आले आहे. प्रकरण मजबूत करण्यासाठी रेल्वे पोलीस आता एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षदर्शींचा शोध घेत आहेत.

Malad Station Murder : मालाड रेल्वे स्थानकात चर्चगेट–बोरिवली धीम्या लोकलमधील सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईतील गणिताचे प्राध्यापक अलोक कुमार सिंग यांची किरकोळ वादातून निर्घृण हत्या झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी आरोपी ओमकार शिंदे याला अटक केली असून, हत्येसाठी वापरण्यात आलेला साडेसोळा सेंटिमीटरचा चिमटा देखील जप्त केला आहे. आता या खटल्याला बळकटी देण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचा शोध घेण्याकरिता कृत्रिम प्रज्ञा (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.

एआयच्या मदतीने प्रत्यक्षदर्शींचा शोध

घटनेनंतर तातडीने रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्याच आधारे आरोपीला स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मात्र लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने आणि अनेक प्रवासी वेगवेगळ्या स्थानकांवर उतरून गेल्यामुळे प्रत्यक्षदर्शींचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. यासाठी आता स्थानकातील ‘एआय’आधारित चेहरा ओळख प्रणालीचा वापर करून त्या वेळेस डब्यात उपस्थित असलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हत्या केल्यानंतर चिमटा स्टेशनच्या पत्र्यावर फेकला

आरोपी ओमकार शिंदे याने हल्ला केल्यानंतर पळ काढताना हत्येसाठी वापरलेला चिमटा मालाड पूर्वेकडील रेल्वे स्थानकाच्या पत्र्यावर भिरकावल्याचे तपासात समोर आले आहे. इमिटेशन दागिन्यांसाठी वापरला जाणारा हा धारदार चिमटा रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी आणि हत्यार ताब्यात आल्याने आता केवळ प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी नोंदवून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया बाकी आहे.

लोकलमधील गर्दीमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा

घटनेच्या वेळी सामान्य डब्यात मोठी गर्दी होती. त्यामुळे साक्षीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून त्या लोकलमधील प्रवाशांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एआय तंत्रज्ञानामुळे तपासाला गती मिळेल, असा पोलिसांना विश्वास आहे.

नेमकं काय घडलं होतं?

शनिवार, २४ जानेवारी रोजी चर्चगेटहून सायंकाळी ४.४६ वाजता सुटलेल्या बोरिवली धीम्या लोकलमध्ये प्रवासादरम्यान किरकोळ कारणावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. महिलांसमोर झालेल्या अपमानामुळे आरोपी ओमकार शिंदे संतापल्याचे सांगितले जाते. काही क्षणांतच हा वाद हिंसक झाला आणि ओमकारने अलोक कुमार सिंग यांच्या पोटात धारदार चिमट्याने वार करून घटनास्थळावरून पळ काढला होता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

"प्रशांत, हे चुकीचं केलंस..." महेश लांडगे यांच्यानंतर प्रशांत जगतापांनीही जागवल्या आठवणी
LPG Price Hiked: बजेटच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक LPG सिलिंडर 49 रुपयांनी महाग