
Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहारच्या हत्येच्या घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत आणखी एक धक्कादायक चाकूहल्ल्याची घटना समोर आली आहे. माहिम रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ धक्काबुक्कीच्या वादातून ३५ वर्षीय व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोराने चाकूने सपासप वार केले. यामुळे पुन्हा केल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गंभीर जखमी अवस्थेत संबंधित व्यक्तीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीचे नाव नवीन प्रसन्ना (वय ३५) असे आहे. नवीन माहिम पश्चिमेतील पितांबर लेन परिसरात राहतात. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते लोअर परळ येथील कार्यालयातून काम आटोपू घरी येत होते. यावेळी माहिम स्थानकाबाहेर पायी जात असताना त्यांचा एका अज्ञात व्यक्तीला धक्का लागला.
हल्लेखोराने या धक्क्यामुळे आपला मोबाईल खाली पडून तुटल्याचा दावा केला. यानंतर नवीन यांच्याकडे नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र नवीन यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपीने संतापाच्या भरात चाकू काढून त्यांच्यावर वार करत घटनास्थळावरुन पळ काढला.
चाकूहल्ल्यात नवीन प्रसन्ना यांच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या. ते घटनास्थळीच कोसळले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नवीन यांचे भाऊ सचिन प्रसन्ना यांनी सांगितले की, नवीन लोअर परळमधील एका जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम करतात. हल्ल्यानंतर नवीन सुमारे १५ तास बेशुद्ध अवस्थेत होते.
या प्रकरणी माहिम पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात आरोपी उपनगरीय रेल्वे मार्गाने घटनास्थळावरून पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपी अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
मयंक लोहार हत्या प्रकरणानंतर पुन्हा वाढली चिंता
ही घटना नुकत्याच घडलेल्या मयंक लोहार हत्या प्रकरणानंतर समोर आली. यामुळे मुंबईतील प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी नालासोपारा लोकलमध्ये पावसामुळे ट्रेनचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून एकाची हत्या झाली. आरोपी रोशन रमेश सुवर्णायाने २२ वर्षीय मयंक लोहार** याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या प्रकरणात आरोपी रोशनला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय हत्येत वापरलेले शस्त्र आणि आरोपीची पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरू आहे.