
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील सत्तासंघर्षाची 'लिटमस टेस्ट' मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. संपूर्ण राज्याचे लक्ष आता 'ईव्हीएम'मधून बाहेर पडणाऱ्या कौलाकडे लागले आहे.
या निवडणुकीत राज्याच्या विविध भागांत मतदारांचा संमिश्र उत्साह पाहायला मिळाला. मराठवाड्यातील परभणीत सर्वाधिक ६६ टक्के मतदान झाले असून, जालन्यातही ६१ टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. शहरी भागांचा विचार करता, पिंपरी चिंचवडमध्ये ५८ टक्के, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये ५७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत ५३ ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले असून, पुण्यात हे प्रमाण ५२ टक्के इतके राहिले आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व २८ महापालिकांमध्ये असलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना. बहुतांश ठिकाणी ४ सदस्यांचा एक प्रभाग आहे, तर काही ठिकाणी ३ ते ५ सदस्यांचे प्रभाग आहेत. या रचनेमुळे मतदारांनी नेमका कोणाला पसंती दिली आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर आता कोणत्या पक्षाला हसण्याची संधी मिळते आणि कोणाला राजकीय हादरे बसतात, याचा फैसला अवघ्या काही तासांत होईल.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. २२७ जागांसाठी झालेल्या या लढतीत राजकारणातील नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. विशेषतः एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबईवर आपला भगवा फडकवणार की भाजप आणि शिंदेसेना त्यांना धक्का देऊन सत्ता काबीज करणार, याकडे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबईसोबतच पुणे (१६२ जागा), नागपूर (१५१ जागा), ठाणे (१३१ जागा) आणि नाशिक (१२२ जागा) यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार, यावर राज्यातील आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्येही अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
आज सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होताच पहिले कल हाती येतील. दुपारपर्यंत राज्याच्या २९ शहरांचा कारभारी कोण असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. गुलाल कोण उधळणार आणि कोणाची दाणादाण उडणार, हे पाहण्यासाठी आता काही तासांचीच प्रतीक्षा उरली आहे.