महानंदवर मदर डेअरीचा ताबा, दूध संघाची शिखर संस्था इतिहास जमा होणार

Published : May 09, 2024, 04:11 PM IST
mahanad dairy

सार

Mahananda : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई म्हणजेच महानंद या संस्थेवर गुजरातच्या मदर डेअरीनं ताबा मिळवला आहे. त्यामुळे ही संस्था आता इतिहास जमा झालेली आहे. 

मुंबई : Mahananda महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई म्हणजेच महानंद या संस्थेवर गुजरातच्या मदर डेअरीनं ताबा मिळवला आहे. त्यामुळे ही संस्था आता इतिहास जमा झालेली आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. ही प्रक्रिया 2 मे ला पूर्ण झाली आहे. मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे.

महानंदवर मदर डेअरीनं ताबा मिळवला असून मदर डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळातर्फे (National Dairy Development Board ) चालवली जाते. महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता. महानंद दूध ही राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्यावरुन एकमेकांवर आरोप केले होते.

253 कोटीची राज्य सरकार करणार मदत

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि महानंद यांच्यावतीनं पुनरुज्जीवनासाठी 253.57 कोटी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्य सरकारने या प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून 253 कोटीची मदत केली जाणार आहेत.

महानंदला 2004 नंतर उतरती कळा

महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई या संस्थेची स्थापना 9 जून 1967 रोजी करण्यात आली होती. राज्यातील दूधसंघांची शिखर संस्था म्हणून या दूध संघाची ओळख होती. महानंद ही संस्था 2004 पर्यंत फायद्यात होती. मात्र, यानंतर राज्यातील दूध संघांनी स्वत:च्या नावाच्या ब्रँडनं दूध विक्री सुरु केली. यानंतर महानंदला उतरती कळा लागली. 2004 नंतर पुढील अवघ्या 12 वर्षांच्या काळात म्हणजेच 2016 पर्यंत महानंद सुरु राहणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.

फेब्रुवारीत महानंदच्या संचालक मंडळाचे राजीनामे

महानंद संस्था एनडीडीबीब म्हणजेच राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्यामध्ये प्रमुख अडसर हा महानंदचे संचालक मंडळ हा होता. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळानं महानंदला संचालक मंडळ नको असल्याबाबतची अट घातली होती. त्यानुसार फेब्रुवारीत महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह संचालक मंडळानं राजीनामा दिला होता.

महानंदवरुन आरोप-प्रत्यारोप

महानंदच्या हस्तांतरण प्रक्रियेवरुन राजकारण रंगलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत महानंदच्या अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळं ही स्थिती ओढवल्याचं म्हटलं होतं. तर, राजेश परजणे यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले होते.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!