
Jain Community Morcha : मुंबईत 7 डिसेंबर रोजी जैन समाजाकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जीव दया आणि कबूतर बचाव’ या महत्त्वाच्या अभियानाला गती देण्यासाठी जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे. कबूतरखाना, जैन मंदिरं आणि अनेक महत्त्वाच्या मार्गांवरून जाणाऱ्या या मोर्चाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा समाजाचा प्रयत्न आहे.
जैन समाजाचा हा विशेष मोर्चा कुलाबा जैन मंदिरातून सुरुवात करून लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ या प्रमुख मार्गांवरून पुढे जाणार आहे. दादर कबूतरखाना जैन मंदिरापर्यंत हा मोर्चा पोहोचणार असून मार्गावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजातील लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रवचनं, उपक्रम आणि जनसहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जैन समाजाची आक्रमक भूमिका
‘जीव दया आणि कबूतर बचाव’ आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी निलेशचंद्रजी महाराज पुन्हा अनशन करण्याच्या तयारीत आहेत. मंदिर पाडकाम, कबूतरखान्यांचे प्रश्न आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी जैन समाजाची मागणी आहे. यामुळे जैन समाज सरकारविरोधात पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक धोरण अवलंबत असल्याचे संकेत मिळत आहेत.
एबीपी माझाच्या ‘माझा महाकट्टा’ कार्यक्रमात सहभागी होताना जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केले. शांतिप्रिय जैन समाजाची मंदिरं पाडण्यात आली, पण अवैध मशिदींवर कारवाई झाली का, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. दोन नेत्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. “माझे प्राण गेले तरी चालतील परंतु समाजाला तोडणाऱ्यांना मी सोडणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
आगामी निवडणुकांमध्ये जैन समाज स्वतंत्र राजकीय शक्ती म्हणून उतरू शकतो का, या प्रश्नावरही महाराजांनी भाष्य केले. “प्रत्येक समाजाची पार्टी आहे, तर जैन समाजाची का नसावी?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागू नयेत म्हणून राजकीय प्रतिनिधित्व मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी पूरग्रस्त विदर्भासाठी दोन कोटी रुपयांची मदत पाठवल्याचा उल्लेखही त्यांनी केला.