
मुंबई: मुंबईकरांसाठी लवकरच एक अनोखा हिरवा श्वास घेण्याचा ठिकाणा खुला होणार आहे. देशातील पहिले मॅन्ग्रोव्ह उद्यान गोराई येथे सुरु होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र मॅन्ग्रोव्ह सेलच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले हे महत्त्वाकांक्षी इको-टुरिझम प्रकल्प सध्या शेवटच्या टप्प्यात असून स्वातंत्र्य दिनाच्या आधी, ऑगस्टच्या मध्यावर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले होणार आहे.
₹३३.४३ कोटींच्या खर्चाने उभारलेले हे उद्यान एकूण ८ हेक्टर संरक्षित मॅन्ग्रोव्ह जंगलावर पसरले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासोबतच लोकांनाही निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी देण्याच्या हेतूने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या उद्यानाचं मुख्य आकर्षण म्हणजे ७५० मीटर लांबीचा उंचावर बांधलेला लाकडी बोर्डवॉक, जो दाट मॅन्ग्रोव्ह जंगलातून वळणावळणाने जात एक शांत क्रीकवर उगम पावतो. या मार्गाची रचना मालाबार हिलच्या एलिवेटेड वॉकवेच्या धर्तीवर करण्यात आली आहे, पण मॅन्ग्रोव्ह परिसंस्थेच्या संवेदनशीलतेचा विचार करून तो पूर्णतः पर्यावरणपूरक साहित्य वापरून तयार करण्यात आला आहे.
प्रकृतीप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी उद्यानात १८ मीटर उंच वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. यावरून परिसरातील स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे विहंगम दर्शन घेता येणार आहे. गोराई परिसरातील जैवविविधता पक्षीनिरीक्षक आणि निसर्ग अभ्यासकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
हे उद्यान केवळ फिरण्यासाठी नव्हे, तर शिक्षणासाठीही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. दोन मजली 'नेचर इंटरप्रिटेशन सेंटर' मध्ये एक मिनी लायब्ररी, शैक्षणिक प्रदर्शनं, माहितीफलक आणि मॅन्ग्रोव्ह इकोलॉजीबद्दल माहिती देणारे व्हिज्युअल्स असणार आहेत. विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत प्रत्येकाला पर्यावरणाची ओळख करून देण्याचा हेतू यामागे आहे.
हे संपूर्ण उद्यान सौरऊर्जेवर चालणारे असून सर्व पायाभूत सुविधा उंचावर उभारण्यात आल्या आहेत, जेणेकरून मॅन्ग्रोव्ह जंगलाची हानी टळेल. यामध्ये एक सुंदर रूफटॉप कॅफे आणि निसर्गाशी संबंधित उत्पादनांची विक्री करणारे गिफ्ट शॉप सुद्धा असणार आहे.
उद्यान प्रवेशासाठी तिकीट शुल्क निश्चित करण्याचा प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे विचाराधीन आहे. मिळणारा निधी उद्यानाच्या देखभाल व पर्यावरणीय उपक्रमांवर खर्च केला जाणार आहे, असा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२०२१ मध्ये या जागेला वनक्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर कामाला सुरुवात झाली. सध्या सर्व संरचनात्मक काम पूर्ण झाले असून लँडस्केपिंग, लाईट्स व पेंटिंग यांसारखी अंतिम कामं सुरु आहेत. नियोजित वेळेनुसार उद्यान ऑगस्टच्या मध्यावर खुलं होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पाचा शुभारंभ माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना (उबठा) आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. अलीकडे त्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत लिहिलं, “मी सुरू केलेल्या आणखी एका प्रकल्पाचं साकार रूप पाहून आनंद झाला.”
एकदा सुरु झाल्यानंतर, गोराई मॅन्ग्रोव्ह पार्क हे मुंबईच्या नकाशावर एक नवा हिरवा ठिपका ठरणार आहे. जिथे शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.