Eknath Shinde : ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ एकत्र, एकनाथ शिंदेंनी टाकला नवा डाव, आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची युती जाहीर

Published : Jul 16, 2025, 03:34 PM IST
Maharashtra Deputy CM Eknath Shinde (Photo/ANI)

सार

बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संयुक्त युती जाहीर केली.

मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक नवीन राजकीय घडामोड घडली आहे. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संयुक्त युती जाहीर केली.

कोणत्याही अटीशिवाय युती

या वेळी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, “एकनाथ शिंदे वेगळ्या स्वभावाचे नेते आहेत. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात, म्हणून कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत. शिंदे यांनी चळवळीतील नेत्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचं आश्वासन दिलं आहे.”

एकनाथ शिंदेंचे भाष्य

युतीच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “आजचा दिवस शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या ऐक्याचा दिवस आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची सेना आहे आणि रिपब्लिकन सेना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सेना आहे. आम्ही दोघंही कार्यकर्ते म्हणून काम करत आलो असून, आजही मी उपमुख्यमंत्री असलो तरी ‘कॉमन मॅन’ म्हणूनच काम करतो.”

शिंदेंनी यावेळी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “मी मुख्यमंत्री झालो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, हे सर्व संविधानामुळेच शक्य झाले. त्यामुळे संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे.”

कार्यकर्त्यांचा पक्ष

शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्ता पक्षाला निवडणूक जिंकवतो, आणि अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याच्या मागे नेत्याने उभं राहिलं पाहिजे. आनंदराज आंबेडकर आणि माझी जोडी एकदम सुपरहिट आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “शिवशक्ती-भीमशक्ती ही कार्यकर्त्यांची फौज आहे. आमचा वैयक्तिक अजेंडा नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी एकत्र आलो आहोत.”

समाजपरिवर्तनासाठी एकत्र

युतीमागील हेतू स्पष्ट करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, “ही युती बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांपासून सुरू होते. महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्त्याप्रमाणे वागत होते.”

ते पुढे म्हणाले, “आंबेडकरी समाज अनेक वर्ष रस्त्यावर लढत आला, पण कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही. त्यामुळे त्यांना सत्तेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही ही युती केली.”

ही युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून, सामाजिक न्याय, समानता आणि विकास यासाठीचा दीर्घकालीन प्रयत्न असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आणि राज्याच्या राजकारणातही ही युती नवे समीकरण निर्माण करू शकते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!