Mumbai : दादर कबुतरखाना बंद केल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून आदेशाचे उल्लंघन, या ठिकाणी कबुतरांना खाणे घालण्यास केली सुरुवात

Published : Aug 13, 2025, 08:59 AM IST
Kabutar Kahana

सार

दादरमधील कबुतरखाना पुन्हा ताडपत्री घालून बंद करण्यात आला आहे. अशातच स्थानिकांकडून उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून एका नव्या ठिकाणी कबुतरांना खाणं घालण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्री टाकून पूर्णपणे झाकला आहे. मात्र, आता जैन समाजाने कबुतरांना खाणे घालण्यासाठी नवीन जागा शोधली आहे. न्यायालयाने परिसरात कबुतरांना खायला टाकण्यास मनाई केली असतानाही स्थानिकांकडून हा आदेश मोडला जात आहे. यापूर्वी फुटपाथवर धान्य टाकणे किंवा कारच्या छतावर धान्य ठेवणे यांसारख्या युक्त्या वापरल्या गेल्या, पण पोलिसांनी कारवाई केली होती. आता जैन मंदिराशेजारील एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नवा कबुतरखाना सुरू झाला आहे.

इमारतीच्या छतावर कबुतरांचा थवा

या इमारतीच्या छतावर कबुतरांसाठी धान्याची पोती रिकामी केली जात आहेत, ज्यामुळे हजारोंच्या संख्येने कबुतरांचा थवा जमा होतो. या परिस्थितीमुळे आसपासच्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. कबुतरखाना बंद करण्यामागील उद्देश म्हणजे परिसरात कबुतरांचा उपद्रव टाळणे होता, पण आता छतावरील या नव्या कबुतरखान्यामुळे प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला उघड आव्हान दिले जात आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे या नव्या कबुतरखान्यावर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.

मराठी एकीकरण समितीचे आंदोलन रोखले

दादर कबुतरखान्याच्या मुद्यावर जैन समाज आक्रमक झाल्यानंतर मराठी एकीकरण समिती मैदानात उतरली होती. दादर कबुतरखाना बंद करण्याच्या मागणीसाठी बुधवारी आंदोलन आयोजित केले होते. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली.

जैन-मारवाडी समाजाविरोधात आरोप

६ ऑगस्ट रोजी जैन आणि मारवाडी समाजाने पोलिसांशी धक्काबुक्की केली, सार्वत्रिक मालमत्तेचे नुकसान केले आणि हजारो जण रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सामान्य नागरिकांना त्रास दिला, असा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला. "याविरोधात मराठी माणसांनी काहीच करायचे नाही का?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा