
मुंबई : कबुतरखाना बंदीवरून वाद पेटला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न देण्यावर बंदी घालून कबुतरखाने बंद केले आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असतानाच, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
“टॅक्स लावा, आम्ही भरण्यास तयार”
दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन आणि गुजराती समाजातील काही लोक तेथे एकत्र जमले. त्यांनी कबुतरांना अन्न देणे आमचे संस्कार असल्याचे ठामपणे सांगितले. "कबुतरांना खाऊ घातल्यावर तुम्हाला जेवढा टॅक्स लावायचा असेल, लावा – आम्ही तो भरण्यास तयार आहोत," असा दावा त्यांनी केला. इतकंच नव्हे, तर “डोनाल्ड ट्रम्पने २५ टक्के टॅक्स लावला होता, तुम्ही आम्हावर १०० टक्के टॅक्स लावा, तरीही आम्ही तो भरू,” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त झाली.
कबुतरखान्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची बैठक
कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयावर सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद आहेत, असे चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. धार्मिक संघटनांनी कबुतरखाने बंदीला विरोध दर्शविला असून, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसेकडूनही सरकारवर टीकेची झोड उठली आहे. बैठकीत उच्च न्यायालयाच्या आदेशावर राज्य सरकारची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया
मुंबईत कबुतरांना अन्न देण्यावर बंदी आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीकडे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून, पक्षीप्रेमी, साधू-संत आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाचा सन्मान राखत, सुवर्णमध्य काढावा, असेही त्यांनी सुचवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अन्नाअभावी कबुतरांचे मृत्यू होऊ लागले असून त्यामुळे नव्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे महापालिकेने संतुलित दृष्टीकोन ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.