
मुंबई: मराठा आरक्षणासाठी तीन दिवसांपासून मनोज जरांगे हे आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. सरकारच्या वतीने समितीने भेट घेऊनही या चर्चेतून काहीही साध्य झालेलं नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून, कायदा, राज्यघटनेच्या चौकटीतच निर्णय घेण्यात येईल, असं म्हटलं आहे.
आझाद मैदान आणि मुंबई परिसरात आंदोलकांनी रविवारी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनाला महाराष्ट्रातून आलेल्या लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी शासकीय पातळीवर बैठकांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागेल, न्यायालयाच्या आधीच्या निर्णयांचा विचार करावा लागेल असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकारने कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केवळ कोणाला खूश करण्यासाठी निर्णय घेतला, तर तो जास्त काळ टिकणार नाही. उलट अशा निर्णयामुळे मराठा समाजाला फसवल्याची भावना निर्माण होऊ शकते. म्हणूनच आम्ही काळजीपूर्वक चर्चा करत आहोत. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीत सातत्याने विचारविनिमय सुरू आहे. त्यासाठी कायदेशीर तज्ज्ञांचे मत घेतले जात आहे आणि त्यातूनच योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल. लोकशाहीत प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा आवश्यक असते, आडमुठेपणाने कधीही तोडगा निघत नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी आम्ही माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीच्या कामामुळे अनेक महत्त्वाच्या नोंदी मिळाल्या आणि अनेकांना प्रमाणपत्रेही मिळाली. शिंदे समितीनेच जरांगे यांना भेटून या प्रक्रियेला वेळ लागेल असे स्पष्ट केले होते, परंतु ते लगेच निर्णयाची मागणी करत आहेत. मात्र, कोणताही निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यावा लागतो, मी घटनाबाह्य पद्धतीने पाऊल उचलू शकत नाही. शेवटी तोडगा हा चर्चेतूनच निघतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न काही जण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सामाजिक प्रश्नातून राजकीय फायदा घेऊ नये,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.