
मुंबई: मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी राजघराण्यातून अजूनही कोणीच पुढं आलं नव्हतं. पण आता छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर उपस्थिती लावून आपण समाजासोबत असल्याचं संदेश दिला आहे.
सरकारकडून मिळणाऱ्या आश्वासनांवर विश्वास ठेवून मराठा समाज आपले आंदोलन थांबवणार नाही, असं शाहू महाराजांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हे आंदोलन गांभीर्याने घेणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी, असा पर्याय आम्ही सरकारसमोर ठेवला होता. यासाठी घटनामध्ये दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असंही खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं.
निवडणुकीत महायुतीने दिलेलं आश्वासन होतं की कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण दिलं जाईल. त्यावर विश्वास ठेवूनच जनतेने महायुतीला सत्ता दिली. आता मराठा समाजाला आरक्षण देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं शाहू महाराजांनी सरकारला सुनावलं. नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, महायुतीतील काही नेते आरक्षणाच्या मुद्द्याला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं दिसत आहे. मात्र सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्य सरकारला दिला आहे.