
BMC Elections : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता रखडलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. येत्या काही महिन्यांत निवडणुका होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीचा वेग वाढवला आहे. याच संदर्भात हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीड तासाहून अधिक काळ महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील महापालिका निवडणुकांची समीक्षा, तयारी, तसेच महायुतीची संयुक्त रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय या बैठकीत अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. स्थानिक पातळीवरील मतभेद दूर ठेवत ‘युती धर्म’ पाळण्यावरही खास भर देण्यात आला.
बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाले आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत प्रत्येक महापालिका आणि झेडपीनिहाय जागावाटपावर स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू होणार असून, त्यानुसार अंतिम आराखडे निश्चित केले जातील, असे संकेत मिळत आहेत. मागील नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी झालेले वाद, गैरसमज आता मागे सोडून एकत्रितपणे लढण्याचा संदेश बैठकीतून देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका वेळेत घेण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. त्यामुळे निवडणुका जानेवारी-फेब्रुवारीत होऊ शकतात, असेही या बैठकीत नमूद करण्यात आले. काही निवडक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ‘मैत्रीपूर्ण लढती’ होऊ शकतात, यावरही चर्चा झाली.
युतीमधील समन्वय बिघडू नये, कटुता निर्माण होऊ नये यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या. नेत्यांनी संघर्ष टाळावा, वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहावे आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याकडे लक्ष द्यावे, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. तसेच महायुतीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या पक्षात फोडाफोड करणार नाहीत किंवा पक्षांतर घडवणार नाहीत, यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घ्यावी आणि नाराज कार्यकर्त्यांना समजूतदारपणे हाताळण्याचीही सूचना करण्यात आली.
अलीकडील नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये झालेले काही वाद आता संपुष्टात आणण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला. मोठ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘झालं गेलं विसरा’ आणि नवीन ताकदीने एकत्रितपणे लढाईसाठी सज्ज व्हा, असा संदेश बैठकीतून सर्व स्तरांवरील कार्यकर्त्यांना देण्यात आला.
महानगरपालिका निवडणुका हे सरकार आणि पक्षांसाठी प्रतिष्ठेचे युध्द मानले जात असल्याने, महायुतीने संयुक्तपणे लढणे ही रणनीतिकदृष्ट्या मोठी घोषणा ठरली आहे.