
BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभर जोरदार कामगिरी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने ११८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, मुंबई महापालिकेवरील गेल्या २५ वर्षांची ठाकरे यांची सत्ता संपुष्टात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत ‘एक्स’वर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे. शिवसेना (शिंदे गट) यांच्या साथीने महायुतीने बहुमताचा आकडा ओलांडला असून, मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निकालामुळे ठाकरे गटाला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे.
१९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी भाजप-शिवसेना महायुतीला चुरशीची लढत दिली. शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांनी मिळून ७१ जागा जिंकत शिंदे गटाच्या विजयरथाला काही अंशी अटकाव केला. मात्र, महायुतीच्या संख्याबळापुढे ठाकरे गटाची ताकद अपुरी ठरली.
निकालानंतर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीका केली. “स्वतःला बाळासाहेबांचे पाईक म्हणवून शिवसेना फोडून भाजपच्या दावणीला बांधून काय मिळवलंत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ज्या मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, त्याच मुंबईत शिवसेनेचे प्रभुत्व संपवण्याच्या कटात सहभागी होऊन काय साध्य झाले? “शिवसेनेचं चिन्ह, पक्ष, आमदार आणि नगरसेवक फोडून अखेर फक्त २८ लोक निवडून आणलीत, मग शिवसैनिक दुबळा करून काय मिळवलंत?” असा घणाघाती सवालही त्यांनी केला.
अखिल चित्रे यांनी पोस्टमध्ये थेट इशारा देत म्हटले की, आज भलेही सत्ता आणि आलिशान आयुष्य मिळाले असेल, पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मुंबईतून शिवसेना संपवण्याच्या कटात सहभागी झाल्याची नोंद इतिहासात होईल.
पोस्टच्या शेवटी चित्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा संदर्भ देत, “आम्ही लढत राहू. ना बाळासाहेबांचा विचार फुसू देऊ, ना शिवसेना. अब याचना नहीं, रण होगा,” असे ठाम शब्दांत स्पष्ट केले.