
BJP MP from Bihar Nishikant Dubey to Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. बिहारचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेबद्दल आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता हाच वादाचा केंद्रबिंदू ठरलेले निशिकांत दुबे थेट मुंबईत येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, त्यांनी मराठीत ट्विट केले असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुंबईचा मुद्दा उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना मराठी बोलण्याचे आवाहन केले होते. यावर प्रत्युत्तर देताना दुबे यांची जीभ घसरली होती. "राज ठाकरेंनी बिहारमध्ये येऊन दाखवावे, त्यांना तिथे धडा शिकवू," असे उघड आव्हान त्यांनी दिले होते. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली होती.
दुबे यांनी केवळ वैयक्तिक टीका करून न थांबता महाराष्ट्राच्या आर्थिक ताकदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "महाराष्ट्र राज्याचा कारभार बिहारसारख्या राज्यांतून येणाऱ्या निधीवर चालतो," असे विधान करून त्यांनी मराठी अस्मितेच्या जखमेवर मीठ चोळले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्या या विधानाचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले.
या विधानाचे गंभीर पडसाद संसदेतही पाहायला मिळाले. दुबे यांच्या विधानामुळे लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. संसदेच्या आवारात काँग्रेसच्या मराठी महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत दुबेंना अक्षरशः घेराव घातला. महाराष्ट्राच्या अपमान करणाऱ्या या नेत्याला महिला खासदारांनी धारेवर धरत जाब विचारला, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
इतका मोठा राडा झाल्यानंतरही निशिकांत दुबे यांनी आता मुंबईत येण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांची भेट घेणार आहेत.
ज्या राज ठाकरेंना बिहारमध्ये येण्याचे आव्हान दिले, त्यांच्याशी मुंबईत येऊन दुबे काय चर्चा करणार?
महाराष्ट्रातील जनतेचा रोष पाहता, दुबेंचा हा मुंबई दौरा शांततेत पार पडणार की आंदोलनाच्या आगीत होरपळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.