BMC Election 2026 : मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचारास मुभा; राज-उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Published : Jan 14, 2026, 02:13 PM IST
BMC Election 2026

सार

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचारास दिलेल्या मुभीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. 

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या, 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच राजकीय वातावरण तापले आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना होणार असतानाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

प्रचार संपल्यानंतरही घरोघर प्रचारास मुभा

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होता. मात्र, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर प्रचार करण्याची परवानगी देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावरून राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“सरकारला जे हवं त्यासाठी आयोग काम करतंय” – राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी विश्रांतीचा कालावधी असायचा. मात्र यावेळी ही प्रथा मोडण्यात आली आहे. “पत्रके वाटण्यास मनाई आहे, पण पैसे वाटता येतात का?” असा थेट सवाल करत त्यांनी निवडणूक आयोग सरकारच्या सोयीसाठी काम करत असल्याचा आरोप केला. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात लक्ष ठेवावे, पैसे वाटप होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नव्या ‘PADU’ मशीनवर संशय

निवडणूक आयोगाने ‘प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट’ अर्थात PADU नावाचे नवे मशीन आणल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ईव्हीएम बंद पडल्यास हे मशीन वापरले जाणार असल्याचे सांगण्यात आले असले, तरी याबाबत आधी कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी नमूद केले. “नवीन मशीन राजकीय पक्षांना दाखवण्याचीही गरज वाटली नाही का? यात गडबड होणार नाही याची खात्री कशी?” असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. याबाबत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

PADU मशीन केवळ आपत्कालीन परिस्थितीतच 

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, PADU मशीन मुंबईत सरसकट वापरले जाणार नाही. केवळ ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बॅकअप म्हणून हे मशीन वापरण्यात येईल.

निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचे थेट सवाल

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासमोर पुढील प्रश्न उपस्थित केले –

1. प्रचार कालावधी संपल्यानंतर आज प्रचाराला मुभा कशी दिली?

2. आतापर्यंतची प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली?

3. मतदानाच्या आदल्या दिवशी भेटीची अधिसूचना आजच का काढली?

4. ‘PADU’ नावाचे नवे मशीन का जोडले जात आहे?

5. या मशीनबाबत राजकीय पक्षांना आधी माहिती का दिली नाही?

6. आयोग सरकारच्या सोयीसाठीच काम करत आहे का?

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Abu Salem Parole Case : गँगस्टर अबू सलेमला 14 दिवसांचा पॅरोल नाकारला, आता शेवटचा मार्ग कोणता?
Mumbai Municipal Election 2026 : मुंबईत उद्या मतदान, मतदारांनी मतदार यादीत असे शोधा आपले मतदान केंद्र आणि नाव